वीज खंडित होण्याची कटकट कायमचीच थांबणार! शेतकरी अन् गावासाठी आता वीजेची स्वतंत्र लाईन; ग्राहकांना लवकरच प्रिपेड मीटर

गावांचा, शहरांचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, पण विजेची यंत्रणा पूर्वीचीच आहे. त्यामुळे सध्याच्या फिडरवरील ट्रान्सफॉर्मरवर (डीपी) क्षमतेपेक्षा अधिक लोड झाल्याने सतत वीज खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शेती व गावांची लाईन स्वतंत्र केली जाणार आहे.
Mahavitaran
Mahavitaransakal

सोलापूर : गावांचा, शहरांचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, पण विजेची यंत्रणा पूर्वीचीच आहे. त्यामुळे सध्याच्या फिडरवरील ट्रान्सफॉर्मरवर (डीपी) क्षमतेपेक्षा अधिक लोड झाल्याने सतत वीज खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शेती व गावांची लाईन स्वतंत्र केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘सुधारित वीज वितरण प्रणाली’ योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील साडेसात हजार डीपींची क्षमता वाढविली जाणार आहे.

शेतीचा लोड दिवसेंदिवस वाढत असून गावातील कुटुंबाची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रान्सफॉर्मवरील लोड क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने सतत वीज खंडित होण्याची समस्या उद्‌भवत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ट्रान्सफॉर्मरपैकी तब्बल सात हजार ५४५ ट्रान्सफॉर्मरवर सद्य:स्थितीत क्षमतेपेक्षा जास्त भार आहे. त्याठिकाणी आता ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्हीएचा बसविला जाणार आहे.

२०० केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूलाच दुसरा १०० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन आहे. केंद्राच्या योजनेमुळे वीज खंडित होण्याची नेहमीच कटकट आता बंद होणार आहे. शेती व गावठाण (गाव) यांची विजेची लाईन स्वतंत्र करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाच वर्षांत ही कामे संपवून नागरिकांना विनाखंडीत वीज मिळेल, असे ‘महावितरण’चे नियोजन आहे.

शेतकरी सोडून सर्वांनाच प्रिपेड मीटर

‘सुधारित वीज वितरण प्रणाली’तून राज्यात युद्धपातळीवर कामे सुरु आहेत. सुरवातीला शेती व गावांची लाईन स्वतंत्र करण्याचे काम पूर्ण झाल्यावर सर्व ग्राहकांना प्रिपेड मीटर बसविले जाणार आहे. राज्यातील अडीच कोटी ग्राहकांना ते मीटर बसविले जातील. शेतीपंपाला मात्र हे मीटर बसविले जाणार नाहीत. प्रिपेड मीटर बसविल्यानंतर ग्राहकांनी जेवढे पैसे भरले, तेवढीच वीज मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शेती अन्‌ गावकऱ्यांचा वीज पुरवठा लवकरच स्वतंत्र

केंद्र सरकारच्या ‘सुधारित वीज वितरण प्रणाली’ योजनेच्या माध्यमातून शेती व इतर ग्राहकांची विजेची लाईन स्वतंत्र करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे ओव्हरलोडेड ट्रान्स्फॉर्मरची क्षमता देखील वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रिपेड मीटर बसविले जातील. योजनेतून कामे पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबेल. दुसरीकडे सौरउर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीनेही नियोजन सुरु आहे.

- रमेश राठोड, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com