
सोलापूर : एमआयडीसीतील कारखान्यांच्या ठिकाणी वाहनांची सहजपणे ये-जा व्हावी, हवा मोकळी तथा खेळती रहावी एवढे मार्जिन (सामासिक अंतर) ठेवणे बंधनकारक आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यावेळी कमीत कमी जिवित आणि वित्तहानी होईल हा हेतू आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीत हा प्रकार दिसतच नाही. बहुतेक उद्योजकांनी मार्जिन स्पेसमध्येच बांधकामे केली आहेत. अनेकांनी नियमबाह्य पद्धतीने कामगार आणि स्वत:च्या राहण्याची सोयही केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हे मान्य केले.
कारखान्यांच्या बांधकामास परवानगी देताना मार्जिन स्पेस निश्चित करुन परवानगी दिली जाते. अग्निशामक विभागाकडून त्याठिकाणी अग्निशमन यंत्रणा उभारल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, उद्योगास सबसिडी आणि सर्व एनओसी मिळाल्यानंतर कालांतराने उद्योजक हे सोडलेला मार्जिन स्पेस बांधकामाने व्यापून टाकतात, असे दिसून आले आहे. डोंबिवली येथील आगीच्या दुर्घटनेनंतर सोलापूर एमआयडीसीच्या विशेष नियोजन प्राधिकरणाने अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सर्व उद्योजकांना पत्र पाठवून मार्जिन स्पेसवरील बांधकाम काढावी, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत असल्याची खात्री करावी, असे आवाहन केले होते.
मात्र, कच्चा माल आणि तयार झालेला पक्का माल एकाच ठिकाणी ठेवता यावा, स्वत:सह कामगारांच्या राहण्याची सोय कारखान्यातच असल्यास काम जास्त होईल, म्हणून अनेकांनी उद्योगाच्याच ठिकाणीच राहण्याची सोय केली आहे. पण, उद्योजकांनी संभाव्य धोका ओळखून अशा बाबींचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन विशेष नियोजन प्राधिकरणाचे उपअभियंता प्रदीप खंदारे यांनी केले आहे.
आता होईल ठोस कार्यवाही
एमआयडीसीतील उद्योजकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी मार्जिन स्पेस ठेवणे बंधनकारक आहे. दुसरीकडे उद्योगाच्या ठिकाणी राहाता येत नाही. पण, दोन्ही बाबींचे पालन अक्कलकोट रोड एमआयडीसीत होत नाही. त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून आता ठोस कार्यवाही होईल.
- दिनेश अंबोरे, अग्निशमन अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर
‘अग्निशमन’ची प्रक्रिया ऑनलाइन अन् पळवाट
प्रत्येक उद्योजकास त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी उभारलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे, चालू आहे यासंदर्भात फॉर्म- बी भरून द्यावा लागतो. ही प्रक्रिया ऑनलाइन असून तो फॉर्म प्रत्येक सहा महिन्याला भरावा लागतो. अतिमहत्त्वाची ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यात पळवाटा खूप आहेत. अनेकजण अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसतानादेखील ही यंत्रणा उत्तम असल्याची माहिती ऑनलाइन भरतात. अशा बाबी आगीच्या घटना घडल्यावर समोर येतात, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
१४ महिन्यांतील सोलापुरातील स्थिती
आगीच्या एकूण घटना
४२९ आगी
आगीत मृत्यू
२६
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील भूखंड
९६०
एकूण सुरू उद्योग
८८७
आगीत एकूण नुकसान
५९ कोटी
जखमी व बचावलेले लोक
७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.