esakal | राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा "या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल पुन्हा लांबला
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc

ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम निवडला नाही, त्यांना जाहिरातीतील जागांप्रमाणे संधी देण्याचा निर्णय झाला.

राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर "एसईबीसी'च्या (SEBC) उमेदवारांना ईडब्ल्यूएस (EWS) व खुल्या प्रवर्गातून (Open category) संधी देण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government) दिले. त्यानुसार 2019 मधील राज्य सेवेच्या (State Service) अंतिम निकालात फेरबदल करताना मुलाखतीस पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा पसंतीक्रम निवडावे लागले. मात्र, ज्यांनी पसंतीक्रम निवडला नाही, त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासंदर्भात "एमपीएससी'च्या (MPSC) तत्कालीन अध्यक्षांनी एक परिपत्रक काढले. परंतु, ती चूक लक्षात आल्यानंतर आयोगाकडून आता त्या निकालात दुरुस्ती केली जात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, 2020 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल गुरुवारपर्यंत जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

राज्य सेवेची मुख्य परीक्षा होऊन दीड वर्षांहून अधिक कालावधी लोटला. जवळपास 413 उमेदवारांची अंतिम निवड करून नियुक्‍तीचे शिफारसपत्रही आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला दिले. मात्र, नियुक्‍तीला विलंब झाला आणि त्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द ठरविले. नियुक्‍तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांसंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्यांना ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून संधी देण्याचे ठरले. त्यामुळे आयोगाला 104 नव्या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या. मुलाखती पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच फेरनिकाल तयार करण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचा आधार घेऊन आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष गवई यांनी पसंतीक्रम न दिलेल्यांना स्पर्धेतून अपात्र ठरविण्यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक काढल्याने निकाल प्रलंबित ठेवावा लागला. काही दिवसांनी नूतन अध्यक्ष व सदस्यांना ही चूक लक्षात आल्यानंतर ते परिपत्रक रद्द करावे लागले. ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम निवडला नाही, त्यांना जाहिरातीतील जागांप्रमाणे संधी देण्याचा निर्णय झाला. आता निकालात फेरबदल करून तो सप्टेंबरअखेर जाहीर केला जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासंदर्भात सचिव स्वाती म्हसे-पाटील यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

हेही वाचा: शहरातील 43 केंद्रांवर राज्य सेवा गट ब-संयुक्‍त पूर्वपरीक्षा

राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेत वाढतील जागा

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल चार-पाच दिवसांत जाहीर केला जाणार आहे. पूर्व परीक्षेत जागा वाढणार नाही हे निश्‍चित झाले आहे. परंतु, शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार मुख्य परीक्षेत काही जागा वाढतील, अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली. मुख्य परीक्षा तीन महिन्यांनंतर म्हणजेच साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

loading image
go to top