रिक्षांचा उजवा दरवाजा प्रवाशांसाठी बंद! अपघात रोखण्यासाठी १५ सप्टेंबरनंतर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्तीने उभ्या रिक्षा
रिक्षांचा उजवा दरवाजा प्रवाशांसाठी बंद! अपघात रोखण्यासाठी १५ सप्टेंबरनंतर कारवाई

रिक्षांचा उजवा दरवाजा प्रवाशांसाठी बंद! अपघात रोखण्यासाठी १५ सप्टेंबरनंतर कारवाई

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात अपघातप्रवण ठिकाणांची (५३) संख्या राज्यात अव्वल आहे. अपघात व अपघाती मृत्यूमध्ये देखील सोलापूर राज्यात टॉप टेनमध्येच आहे. त्यावर उपाय म्हणून आता ऑटोरिक्षातून प्रवाशांना वाहनाच्या डाव्या बाजूनेच उतरावे लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षांच्या उजव्या बाजूचा दरवाजा प्रवाशांसाठी बंद करावा, असे निर्देश आरटीओने दिला आहे.

सोलापूर शहर-ग्रामीणमधील ऑटोरिक्षांच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला. १ ऑगस्टपासून नवे दर लागूदेखील झाले. प्रवाशांची लूट होऊ नये, रिक्षाचालक मनमानी करू नयेत म्हणून त्यांना मीटर कॅलिब्रेशन करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शहरात जवळपास १५ हजार ८८४ ऑटोरिक्षा असून त्यातील १० टक्के रिक्षाचालकांनी सुद्धा मीटर कॅलिब्रेशन केलेले नाही, हे विशेष. तीन महिन्यांपर्यंत मीटर कॅलिब्रेशन करून न घेणाऱ्या रिक्षाचालकांना वाढीव दरानुसार भाडे आकारता येणार नाही, असेही आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, वाढत्या अपघातांवर उपाय म्हणून सर्वच रिक्षांचा उजव्या बाजूचा (रस्त्यावरील वाहतुकीची बाजू) दरवाजा बंद करावा लागणार आहे. त्या ठिकाणी लोखंडी बार किंवा स्वतंत्र दरवाजा बसवावा, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी रिक्षाचालकांना १० ते १५ सप्टेंबरपर्यंत सवलत (मुदत) दिली आहे. त्यानंतर मात्र तशा रिक्षांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दरवाजा बंदचे फायदे...

 • दोन्ही बाजूपैकी उजवा दरवाजा बंदमुळे अपघात होणार नाहीत

 • रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा कमी होऊन स्वयंशिस्त लागेल

 • शहर-जिल्ह्यातील अपघात व अपघाती मृत्यू कमी होतील

 • रस्त्यांवर थांबून दोन्ही बाजूंनी प्रवासी बसविण्यामुळे होणारी वाहतूक कोंडी थांबेल

अपघात कमी होतील

शहर- जिल्ह्यातील सर्वच ऑटोरिक्षांतून उजव्या बाजूला (रस्त्याकडील बाजू) कोणताही प्रवासी उतरणार नाही, यासाठी रिक्षांचा तो दरवाजा बंद असावा. त्याला आडवे बार बसवून घ्यावेत. दोन्ही बाजूंनी प्रवासी उतरणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

वाहनचालकांनो, ‘या’ ठिकाणी जरा जपून

शहर परिसरात केगाव, बाळे चौक, जुना पुणे नाका (मडके वस्ती), एसटी स्थानक, मार्केट यार्ड, जुना बोरामणी नाका, शांती चौक, जुना विजयपूर नाका, आयटीआय पोलिस चौकीसमोर, इंचगिरी मठासमोर, सैफुल चौकी, एसआरपी कॅम्प चौक, सोरेगाव चौकी, जुना अक्कलकोट नाका, आसरा चौक, सात रस्ता, मुळेगाव क्रॉस रोड, जुना तुळजापूर नाका, देगाव टोल नाका ही अपघातप्रवण ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी सातत्याने अपघात झाले असून, मृतांची संख्यादेखील सर्वाधिक राहिली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरटीओ व पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.

 • जिल्ह्यातील रिक्षांची संख्या

 • १७९०

 • दरवर्षीचे सरासरी अपघात

 • ४६७

 • वर्षाचे सरासरी अपघाती मृत्यू

 • ३७०

 • बेशिस्तांवरील दरवर्षीची कारवाई

 • ६०,०००