Devendra Fadanvis: सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला; उपमुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis: सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला; उपमुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis: सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला; उपमुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात येणारे 4 ते 5 प्रकल्प राज्याबाहेर गेले. यामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप याचं सत्र सुरू झालं आहे. अशातच हे प्रकल्प जाण्यामागे सरकारने विरोधकांना जबाबदार धरलं तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे.

दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हैदराबादला गेला आहे. त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण चांगलं नाही असं मत प्रकल्पाच्या प्रमुखांनी मांडलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी या प्रकल्पाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. 2 मार्च 2021 रोजी सॅफ्रनच्या प्रमुखांनी ट्विट करत माहिती दिली होती की ते हैदराबादला प्रकल्प सुरू करत आहेत.

हेही वाचा: Devendra Fadanvis: उलट केंद्र सरकारचे आभार मानायला हवेत; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

फडणवीस बोलताना म्हणाले की, राज्यात त्यांच्या सरकारच्या काळात प्रकल्प गेले आणि आता आमच्या काळात प्रकल्प गेल्याचा गाजावाजा केला जात आहे. जेव्हा प्रकल्प गेला तेव्हा ठाकरे सरकारने अजिबात लक्ष दिलं नाही पत्र व्यवहार केला नाही. संपर्क केला नाही असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला, मंत्री जेलमध्ये गेले. त्यामुळे महाराष्ट्रात कुणीही यायला तयार नव्हतं. महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचं काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना कॅबिनेटने मान्यता दिली आहे. एका मीटिंगमध्ये आम्ही ते मंजूर केले आहेत.