कोरोनाची ओसरतेय लाट! प्रतिबंधित लसीमुळे तीव्रता झाली कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
कोरोनाची ओसरतेय लाट! प्रतिबंधित लसीमुळे तीव्रता झाली कमी

कोरोनाची ओसरतेय लाट! प्रतिबंधित लसीमुळे तीव्रता झाली कमी

सोलापूर : संपूर्ण जगाला जागेवर थांबवणाऱ्या कोरोनाचा वेग आता कमी होऊ लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे प्रतिबंधित लसीकरणामुळे विषाणूची तीव्रतादेखील कमी झाली आणि मृत्यूचे तांडव थांबले. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची लाट आता ओसरू लागली असून सध्या ग्रामीणमध्ये ५१ तर शहरात २७ सक्रिय रुग्ण आहेत.

एप्रिल २०२० मध्ये सोलापुरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत शहरातील ३४ हजार २४४ तर ग्रामीणमधील एक लाख ८७ हजार २०९ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील पाच हजार २४१ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तरीपण, जिल्ह्यातील दोन लाख १६ हजार १३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनाच्या तिन्ही लाटानंतर वाढलेल्या कोरोनाची गती आता पुन्हा कमी झाली आहे. सुरवातीला जीवघेणा ठरलेला विषाणू आता प्रतिबंधित लसीकरणामुळे बोथट झाला आहे. बाधित रुग्ण आता चार-सहा दिवसांत बरा होत आहे. त्यामुळे त्या रुग्णाला त्यांच्या स्वत:च्या घरी उपचार करण्यास परवानगी दिली जात आहे. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत नाहीत. बाधित होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा पॉझिटिव्ह आल्यावर काय उपाय करावेत, याची कल्पना आता बहुतेक नागरिकांना आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत नसल्याची स्थिती आहे. सध्या माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर शहरातील कोरोना हद्दपार झाला आहे. सध्या बार्शी तालुक्यात सर्वाधिक १६ तर माढा तालुक्यात दहा रुग्ण आहेत. उर्वरित सर्वच तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या सात ते दोन एवढीच आहे.

जिल्ह्यात सव्वालाख डोस शिल्लक

जिल्ह्यातील चार लाख १९ हजार व्यक्तींनी अद्याप प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. ११ लाखांहून अधिक लोक दुसऱ्या डोसपासून दूर आहेत. तब्बल १८ लाख ८७ हजार ३४० जण संरक्षित (बुस्टर) डोस घेण्यास पात्र झाले आहेत. लसीकरणाचा वेग मंदावला असला, तरीदेखील लसीची मागणी कायम आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख २० हजार डोस शिल्लक असून त्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिनचे प्रत्येकी ३० हजार आणि कोर्बोवॅक्सचे ६० हजार डोस आहेत.

जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती

  • एकूण टार्गेट

  • ३४,१४,४००

  • पहिला डोस घेतलेले

  • २९,९४,७२७

  • दोन्ही डोस घेतलेले

  • २३,०३,७०४

  • संरक्षित डोस घेतलेले

  • १,४१,५३५

Web Title: The Suffering Of Corona Is Reduced Prevented Vaccines Reduce The Original

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..