

solapur sp atul kulkarni
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर-ग्रामीणमधील नागरिकांना आता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळविण्यासाठी ‘११२’ क्रमांक डायल करावा लागणार आहे. पोलिसांमार्फत ‘डायल ११२’ ही अत्याधुनिक सेवा प्रभावीपणे राबवली जात आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना संकटसमयी या टोल-फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
‘डायल ११२’ ही संपूर्ण देशासाठी एकच एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद सेवा आहे. या एकाच क्रमांकावरून नागरिकांना पोलिस, अग्निशमन दल (फायर ब्रिगेड) आणि रुग्णवाहिका (ॲम्बूलन्स) या तिन्ही अत्यावश्यक सेवांची मदत मोफत मिळते. कोणत्याही मोबाईल किंवा लँडलाईनवरून हा क्रमांक डायल करता येतो. चोरी, दरोडा, घरफोडी किंवा संशयास्पद हालचाली, महिलांवरील अत्याचार, छेडछाड किंवा कौटुंबिक हिंसाचार, रस्ते अपघात, जखमी व्यक्ती किंवा वैद्यकीय मदत, भांडणे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या क्रमांकावर मदत मागता येईल. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, आग किंवा इतर दुर्घटना, हरवलेल्या व्यक्ती, लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांना देखील या क्रमांकावरून मदत मिळणार आहे. मात्र, खोटी माहिती दिल्यास किंवा विनाकारण कॉल केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महिला, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ॲप
‘डायल ११२’ची सेवा २४ तास कार्यरत असून कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षाकडून त्वरित प्रतिसाद दिला जातो. ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटनास्थळाच्या सर्वात जवळ असलेल्या पोलिस वाहनाला संदेश पाठवून कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली जाते. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ‘११२ इंडिया’ हे मोबाईल ॲप उपलब्ध आहे. यात SOS बटण, लाईव्ह लोकेशन शेअरिंग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ॲप महिला, विद्यार्थी व एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त आहे.
जबाबदारीने क्रमांकाचा वापर करावा
डायल ११२ या क्रमांकावर कॉल करताना संबंधित व्यक्तीने घटनास्थळ आणि घटनेची अचूक माहिती द्यावी. वेळेत दिलेली माहिती कोणाचातरी जीव वाचवू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा आपत्कालीन क्रमांक लक्षात ठेवून जबाबदारीने त्याचा वापर करावा.
- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.