मुलांशिवाय राहणाऱ्या वृद्धांच्या घरांवर चोरट्यांची नजर! मुले शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेरगावी; ग्रामीणमध्ये शेळ्या-बोकडांची चोरी वाढली

मुले शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परजिल्ह्यात स्थायिक झाल्याने मुलांशिवाय दोघेच राहणाऱ्यांची संख्या सोलापुरात हजारोंच्या घरात आहे. त्यांचे नेहमीच मुलांकडे येणे-जाणे राहते, काही ज्येष्ठ दांपत्य देवदर्शनासाठीदेखील चार-पाच दिवसांसाठी बाहेरगावी जातात.
sakal
TheftTheft
Updated on

सोलापूर : मुले शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परजिल्ह्यात स्थायिक झाल्याने मुलांशिवाय दोघेच राहणाऱ्यांची संख्या सोलापुरात हजारोंच्या घरात आहे. त्यांचे नेहमीच मुलांकडे येणे-जाणे राहते, काही ज्येष्ठ दांपत्य देवदर्शनासाठीदेखील चार-पाच दिवसांसाठी बाहेरगावी जातात. अशावेळी त्या बंद घरांमध्ये चोरी होत असल्याचे चित्र सोलापूर शहरात आहे.

मुलांशिवाय सोलापूर शहरात किती ज्येष्ठ पती-पत्नी राहातात, याची आकडेवारी ना पोलिसांकडे ना महापालिकेकडे आहे. हजारो तरुण-तरुणी आई-वडिलांशिवाय पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये शिक्षण, नोकरीसाठी गेले आहेत. त्या वृद्ध तथा ज्येष्ठांना मुला-मुलीची, नातवांची आठवण आली किंवा आजारी पडल्यावर ते घर बंद करून काही दिवसांसाठी मुलांकडे जातात. ही संधी साधून चोरटे वेगवेगळ्या भागातील बंद घरांचा अंदाज घेऊ दिवस असो की रात्र, त्याठिकाणी हमखास डाव साधतात ही बाब सोलापुरात नेहमीचीच झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुलांशिवाय एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची माहिती संकलित करून त्याठिकाणी किमान दोन-तीन दिवसातून एकदा भेट दिल्यास निश्चितपणे त्यांनाही सुरक्षित वाटेल आणि चोरी, घरफोडीसारख्या घटनाही टळतील, असा विश्वास सर्वांनाच आहे.

ग्रामीणमध्ये शेळ्या-बोकडांची चोरी

मटणाचे भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोचल्याने चोरट्यांनी आता चोरीची पद्धत बदलून ते गायी-म्हशींऐवजी घरासमोर किंवा गोठ्यात बांधलेल्या शेळ्या-बोकडांची चोरी करू लागले आहेत. चोरलेल्या शेळ्या-बोकडे नेमकी कोणाची व कोणती, याचा तपास सहजासहजी करता येत नाही. त्यामुळे चोरी केली तरी आपल्याला पोलिस पकडू शकणार नाही हे ओळखून चोरटे शेतकऱ्यांच्या शेळ्या-बोकडे चोरत असल्याचे दिसते. मागील दोन महिन्यांत शेळ्या-बोकडांची चोरी झाल्याचे ३० पेक्षा अधिक गुन्हे ग्रामीण पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

१५ महिन्यांतील अंदाजे चोरी-घरफोड्या

  • सोलापूर शहर : ९८९

  • ग्रामीण पोलिस : ९६८

  • एकूण : १,९५७

  • तपास अपूर्ण : ३५ ते ४२ टक्के

चोरी १५ लाखांची, पण नोंद ७.४० लाखाचीच

सोलापुरातील सिव्हिल लाईन परिसरातील माजी सैनिक मनोहर वसंत शेळके (वय ६२) यांचा मुलगा अमेरिकेत असतो. सध्या पती-पत्नी दोघेच घरी असतात. त्यांच्या घरातून चोरट्यांनी एकूण १५ लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे त्यांनी सांगितले. पण, काही दागिन्यांच्या पावत्या उपलब्ध नसल्याने पोलिसांत केवळ सात लाख ४० हजाराचेच दागिने चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. अनेक घटनांमध्ये असा प्रकार आढळतो.

मदतीला ‘डायल ११२’ पण...

अडचणीतील ज्या व्यक्तीस पोलिसांची मदत आवश्यक आहे, त्यांना ११२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास १० ते १२ मिनिटात मदत मिळते. त्या क्रमांकाची अनेकांना मदत देखील झाली आहे, पण बंद घरांमध्ये चोरी रोखण्यासाठी माहिती संकलित करून त्याठिकाणी नियमित गस्त हाच उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com