आगामी महापालिका निवडणुकांसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने तयार केलेल्या प्रभागरचनेत गंभीर त्रुटी आढळल्याने मंत्रालयाने संपूर्ण आराखडा फेटाळला होता. नैसर्गिक सीमांकन चुकीचे, प्रगणक गटातील विसंगती आणि लोकसंख्येच्या निकषांचे उल्लंघन अशा अनेक मुद्द्यांवर मनपा प्रशासनाला खरडपट्टी खावी लागली. या चुकांमुळे आराखडा सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आखला गेला असल्याचा संशयही व्यक्त झाला. परिणामी मनपा प्रशासनाने अवघ्या पंधरा दिवसांत नवे सीमांकन करून दुरुस्त आराखडा गुरुवारी पुन्हा मंत्रालयात सादर केला. या घटनेमुळे प्रशासनाची मोठी बदनामी झाली असून नागरिक आणि राजकीय पक्षांत नाराजी पसरली आहे. आता नव्या आराखड्याला मंजुरी मिळून निवडणूक प्रक्रिया गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.