Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

‘माणसे आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. मागणी केल्यास संबंधित गावात तीन दिवसांत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची सोय केली जाईल.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

छत्रपती संभाजीनगर - ‘माणसे आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. मागणी केल्यास संबंधित गावात तीन दिवसांत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची सोय केली जाईल. त्याशिवाय पशुधनासाठी मुबलक चारा उपलब्ध आहे, गरजेनुसार आणखी चारा उपलब्ध करून दिला जाईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे उपलब्ध असून बोगस बियाणांबाबत तक्रार आल्यास दोषींना थेट तुरुंगात टाकण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मराठवाड्यातील टंचाई स्थिती व दुष्काळाचा आढावा घेतला. या बैठकीला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना शिंदे म्हणाले,‘‘मराठवाड्यात सध्या १२४९ गावे व ५१२ वाड्यात १८३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

गरज पडल्यास आणखी टॅंकर वाढवले जातील. पाण्याच्या टंचाईबाबत प्रशासनाला कळविल्यास दिल्यास तीन दिवसांत टँकरची सोय करण्याची व्यवस्था केली आहे. शुद्ध आणि दर्जा तपासलेले पाणी जनतेला मिळावे, सोबतच जनावरांनाही पिण्याचे पाणी पुरविले जावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मदतीसाठी पाठपुरावा सुरू

शिंदे म्हणाले,‘‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्याला वॉटर ग्रीड दिले. त्यानंतरच्या सरकारने ते रद्द केले. आता पुन्हा नव्याने आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करून वॉटर ग्रीड सुरू करत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासह प्रत्येक प्रश्न आम्ही संवेदनशीलतेने हाताळतो आहोत.

नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. विमा परतावाचा प्रश्न असो किंवा मदतीचा प्रश्न असो; त्यातील अडचणी तत्परतेने सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. विमा परताव्यात हलगर्जी करणाऱ्यांची गये केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’

मुख्यमंत्र्यांची सारवासारव

मराठवाड्याबाबतच्या गंभीर विषयावर झालेल्या आजच्या बैठकीला फक्त दोनच पालकमंत्री हजर होते. याविषयी विचारले असता, ‘इतर पालकमंत्री हे लोकसभेचे उमेदवार असल्याने ते बैठकीला हजर राहू शकले नाही,’ असे म्हणत शिंदेंनी वेळ मारून नेली.

मुख्यमंत्री म्हणाले..

  • पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न

  • थकीत वीजबिलामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत, असे आदेश

  • भूजल पातळी वाढविण्याबाबत संबंधित विभागांना सूचना

  • सामाजिक संस्थांचीही मदत घेणार

  • गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या उपक्रमांतून पाणी साठे वाढविण्यास मदत होईल.

  • अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर केले जातील

काळाबाजार करणाऱ्यांची गय नाही

‘खरीप हंगाम जवळ आला आहे. बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु बोगस बियाणांबाबत तक्रार आल्यास दोषीला थेट तुरुंगात टाकण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आपण केल्या आहेत. कृषी यंत्रणेने सजग राहून सर्व चौकशी व तपासणी करून बोगस बियाणे आढळणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ अशा सूचना केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com