यंदा शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन पद्धतीने होणार; राज्य सरकारने दिले आदेश

गजेंद्र बडे
Wednesday, 15 July 2020

शिक्षकांच्या बदल्या ३१ मे पूर्वी करण्यात येतात. मात्र याआधी यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. परंतू ही स्थगिती मागे घेत येत्या ३१ जुलैपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश ७ जुलैला काढण्यात आला आहे.

पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या यंदा ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. या बदल्यांची प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिला आहे. कोरोनामुळे यंदा ऑफलाइन बदल्या करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. 

शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब द्या; शिक्षण मंत्र्यांकडे कुणी केली मागणी?​

जिल्ह्यातील एकूण शिक्षकांपैकी १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ मधील नियमांचाच अवलंब करावा आणि बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांचे बदली अर्ज जमा करण्यासाठी तालुकास्तरीय पथके स्थापन करण्यात यावीत, असा आदेशही सरकारने जिल्हा परिषदेला दिला आहे. 

दरम्यान, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या पूर्वीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहेत. यासाठी समन्वयक म्हणून नंदूरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी पुणे आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे.

अखेर माजी आमदार विनायक निम्हण आणि सनी निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल​

दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या ३१ मे पूर्वी करण्यात येतात. मात्र याआधी यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. परंतु ही स्थगिती मागे घेत येत्या ३१ जुलैपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश ७ जुलैला काढण्यात आला आहे. मात्र या आदेशात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे यंदा आपल्या बदल्या होणार नाहीत, या अपेक्षेने शिक्षकांना दिलासा मिळाला होता, पण या नव्या आदेशामुळे बदल्यांमधून शिक्षकांना सूट नसल्याचे उघड झाले आहे.

सर्वच पदांची भरती 'एमपीएससी'तर्फे करा; उच्चस्तरीय बैठकीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्ह्यात १७०० शिक्षकांच्या बदल्या? 

जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शिक्षकांपैकी जास्तीत जास्त १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्याचे बंधन या आदेशात घालण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे साडेअकरा हजार शिक्षक आहेत. त्यामुळे या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ७०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of primary teachers in Pune Zilla Parishad schools will be done offline this year