परिवहन मंत्री म्हणाले... मुख्यमंत्र्यांच्या "या' निर्णयानंतरच सुरू होईल एसटी बस !

ST Bus
ST Bus

सोलापूर : कोरोनामुळे राज्यात 24 मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. काही प्रमाणात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होत आहे. मात्र, जिल्हाबंदीचा निर्णय कायम ठेवल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा अद्यापही बंदच आहे. त्यामुळे कामगारांच्या वेतनाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून महामंडळाचा संचित तोटा आता सात हजार कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे आता ज्या मार्गावर बस वाहतूक फायद्याची ठरेल, अशा मार्गांवर बससेवा सुरु करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे साडेसतरा हजार बस असून एक लाख पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाउन काळात महामंडळाला दररोज सरासरी 22 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारच्या मदतीची वाट पाहावी लागली. सरकारकडे दोन हजार कोटींची मागणी करण्यात आली, मात्र राज्याच्या तिजोरीतही अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने राज्य सरकारने तेवढी मदत केली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता राज्यभर बससेवा सुरू करण्याशिवाय महामंडळाकडे दुसरा पर्यायच नसल्याचे चित्र आहे. मात्र, एका सीटवर एकच प्रवासी बसविल्यास, वारंवार बसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, इंधनावरील एकूण खर्च आणि वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न किती असेल, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. आठवडाभरात तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर फायदेशीर ठरणारे मार्ग कोणते असतील, त्या ठिकाणी मुबलक बस सोडल्या जाणार आहेत. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशा मार्गांबाबत महामंडळ काय निर्णय घेणार, याचीही उत्सुकता आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले... 

  • राज्य परिवहन महामंडळाची सेवा बंद असल्याने प्रवाशांची होतेय ओरड 
  • एसटीची वाहतूक अशीच बंद राहिली तर प्रवासी संख्या घटण्याची भीती 
  • राज्यातील ठराविक मार्गांवर पहिल्या टप्प्यात सुरू होईल परिवहनची सेवा 
  • कोणत्या मार्गावरील बससेवा उत्तम चालेल, प्रवासी असलेल्या मार्गांचा अभ्यास आठवडाभरात होईल 
  • परिवहन सेवा बंद राहिल्यास कामगारांच्या वेतनाचा मोठा प्रश्‍न 

लॉकडाउन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी होईल चर्चा 
परिवहनमंत्री ऍड. अनिल परब म्हणाले, राज्यातील लॉकडाउनची मुदत 31 ऑगस्टला संपुष्टात येईल. तत्पूर्वी, राज्यातील बससेवा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. जिल्हाबंदी उठल्यानंतर राज्यभर बससेवा सुरू केली जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com