परिचारकांचा वाडा झाला कार्यकर्त्यांसाठी पोरका..!

Paricharak Wada
Paricharak Wada

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर तालुक्‍यातील पांडुरंग परिवाराचा आधारवड आणि अनेक कार्यकर्त्यांचा देवमाणूस सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने अवघा पंढरपूर तालुका सुन्न झाला आहे. हक्काने आणि अधिकाराने आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी एकमेव ठिकाण असलेला मालकांचा वाडा त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी आणि हजारो कार्यकर्त्यांसाठी आता पोरका झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणासाठी मालकांचा वाडा अनेक वेळा राजकीय केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीमध्ये सुधाकर परिचारकांचा अंतिम सल्ला घेतला जात असे. 
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय वाटचालीमध्ये परिचारकांचे मोठे योगदान असल्याचे आज मान्य केले जाते. गल्लीतील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते जिल्ह्यातील एखाद्या नेत्यापर्यंतची सर्व मंडळी वाड्यावर येऊन सुधाकरपंत परिचारकांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडत असत. त्यानंतर एका आत्मविश्वासाने कार्यकर्ता हसतमुख चेहऱ्याने बाहेर पडत असत. 

कार्यकर्त्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर
डोक्‍यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून छोट्या कार्यकर्त्यांपासून ते वृद्धांपर्यंतच्या कार्यकर्त्यांना ते मान आणि सन्मान देत असत. त्यांच्या मृदू स्वाभावामुळे विरोधक देखील त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मागील आठ ते दिवसांपासून ते बरे होऊन लवकर घरी यावेत, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. अनेक ठिकाणी होमहवनही करण्यात आले. परंतु शेवटी सोमवारी (ता. 17) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहर व तालुक्‍यात सन्नाटा पसरला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली; परंतु कोरोनामुळे पोलिसांनी वाड्यासमोर गर्दी होऊ नये यासाठी बंदोबस्त ठेवला आहे. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्‍या नेत्याचे अंतिम दर्शन घेता न आल्याने अनेक कार्यकर्ते भावविवश झाले आहेत. 

कार्यकर्त्यांची मोठी हानी
अनेक छोट्या कार्यकर्त्यांना सुधाकरपंत परिचारक यांनी काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सहकारी संस्था आज उभ्या आहेत. त्यांची निस्पृह सेवावृत्ती आणि शेतकऱ्याप्रती असलेल्या तळमळीतून अनेकांना त्यांनी रोजगार दिला . त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मोठी हानी झाल्याची भावना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी व्यक्त केली. 

नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. कार्यकर्त्यांनी धीर धरावा असे भावनिक आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com