बारावीची पुस्तके लवकरच ‘ऑनलाइन’

संतोष शाळिग्राम
मंगळवार, 7 एप्रिल 2020

शिक्षण आयुक्त आणि संचालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. त्यात बारावीच्या बदललेल्या पुस्तकांचे पीडीएफ संकेतस्थळावर देण्याविषयी चर्चा झाली आहे. लवकरच त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न आहे.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

पुणे - राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला खरा; पण त्याची पुस्तके मिळणार कधी, असा प्रश्‍न शाळांना पडला आहे. त्यामुळे ही पुस्तके पीडीएफद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

शालेय शिक्षण विभाग दरवर्षी टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमात बदल करत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला होता. नव्या धोरणानुसार परीक्षा या प्रश्‍नपत्रिका नव्हे; तर कृती पत्रिकांच्या आधारे घेतल्या जाव्यात, असा उद्देश समोर ठेवून अभ्यासक्रमाची फेररचना करण्यात येत आहे. दहावीच्या प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूपही बदलले आहे. त्यानंतर अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला होता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्याची पुस्तके बालभारतीने छापलेली आहेत. परंतु, ‘लॉकडाऊन’ असल्याने ही पुस्तके बाजारात आणायची कशी, असा प्रश्‍न सरकारी यंत्रणेपुढे आहे. त्यात दुकाने बंद असल्याने पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार कशी, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात शिकवायचे कसे, अशी विचारणा शाळांकडून केली जाऊ लागली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी सक्तीने घरात बसून आहेत. अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन धडे देण्याचे नियोजन शाळांनी केले होते. मात्र, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकत नसल्याची खंत या शाळांनी व्यक्त केली आहे.

पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्याच्या पीडीएफ तरी बालभारतीने त्यांच्या संकेतस्थळावर द्याव्यात, अशी मागणीही शाळांकडून होऊ लागली आहे
‘बालभारती’चे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘बारावीच्या सर्व विषयांची पुस्तके छापलेली आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे ही पुस्तके शाळा वा दुकानांमध्ये पाठविता येत नाहीत. ही पुस्तके शाळांपर्यंत कशी पोचवायची याबद्दल विचार सुरू आहे. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twelth books online soon