esakal | वाघांची संख्या तर वाढली, परंतु हा धोकाही दुपटीने वाढला, काय सांगते आकडेवारी... 
sakal

बोलून बातमी शोधा

Twice the number of human deaths in tiger attacks

राज्यातील वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या, विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी सात महिन्यांत फक्त 16 जणांचे मृत्यू झाले होते.

वाघांची संख्या तर वाढली, परंतु हा धोकाही दुपटीने वाढला, काय सांगते आकडेवारी... 

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : वाघांची संख्या वाढल्याने राज्यात गेल्या सहा महिन्यांत मानव-वन्यप्राण्यांच्या संषर्घात दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 38 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 22 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले असून, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16 मृत्यू झाले आहेत. नागरिकांचा जंगलातील वावर वाढल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली. शासनाला यापोटी आता 15 लाख प्रतिव्यक्ती प्रमाणे पाच कोटी 70 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना द्यावे लागणार आहे. 

राज्यातील वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या, विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी सात महिन्यांत फक्त 16 जणांचे मृत्यू झाले होते. त्यातुलनेत हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावामध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच बफर आणि गावामध्ये सुरू झाला आहे. वाघ, बिबट्यासह अस्वल, गवा, रानडुकरांचे वास्तव्य असलेल्या भागात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे घटनावरून लक्षात येत आहे. 

हेही वाचा - तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन्‌ लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...
 

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसह इतरही परिसरातही वाघाची संख्या वाढली आहे. त्या तुलनेच जंगलाचे क्षेत्र कमी पडत असल्याने या जिल्ह्यातील वाघ इतरत्र संचार करीत आहेत. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची लढाईही होऊ लागली आहे. मानव-वन्यप्राण्याचा संघर्षही वाढला आहे. वाघ शिकार, पाण्याच्या शोधात जंगलाशेजारील गावात प्रवेश करतात. 

वन विभागाकडील आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16, गडचिरोलीत तीन, भंडारा, गोंदियामध्ये प्रत्येकी दोन तर नागपूर जिल्ह्यात एका जणांचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणाचे जीव गेले आहेत. नाशिक दोन, वर्धा, चंद्रपूर, अहमदनगर येथे प्रत्येकी एक कोल्हापूर जिल्ह्यात गव्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाला जीव गमवावा लागला. 

चंद्रपूर जिल्ह्यात जंगल क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा वाघांच्या संख्या अधिक झालेली आहेत. वाघांची वाढलेली संख्या लक्षात घेता तज्ज्ञाच्या अहवालानुसार वन विभागाने येथील वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. व्याघ्र अभ्यासकांकडून या निर्णयाला चुकीचा असल्याचे सांगत आहे. मात्र, वाढत्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांकडूनही वाघांना स्थलांतरित करा अशी मागणी होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 15 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. 

त्यामुळेही घटनेत वाढ झाल्याचे काही अधिकारी, वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक दबक्‍या आवाजात बोलत आहेत. यामुळे यापुढे जंगलात जाणाऱ्या व्यक्तीचे वय काय हाही निकष लक्षात घेऊन सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. पोलिस पाटील, सरपंच आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीवरही त्याची जबाबदारी निश्‍चित करावी असा सूर उमटू लागला आहे. 

वर्ष - मनुष्यांचा मृत्यू 

  • 2016 - 53 
  • 2017 - 50 
  • 2018 - 36 
  • 2019 - 32 
  • जून 2020 पर्यंत - 38 

 
संख्यावाढीमुळे हल्ले 
वाघांची संख्या वाढल्याने राज्यात हल्ले वाढलेले आहेत. त्यासोबतच बिबट, अस्वल, गवा, रानडुक्करांच्या हल्लात मानवाचा जीव गेला आहे. याची कारणमीमांसा करण्यात येत आहे. 
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)