जयंत पाटलांचे आश्वासन बोलाची कढी, बोलाचाच भात ठरले; 'जलसंपदा'त कुरबुर

विजय लाड
Monday, 14 December 2020

जलसंपदा विभागातील अभियंत्यांना डावलल्याने पदोन्नती मिळणाऱ्या जलसंपदा विभागातील अधिकारी वर्गात नाराजी आहे.

कोयनानगर (जि. सातारा) : राज्याच्या जलसंपदा विभागातील बदल्यांचे चक्र गत वर्षापासून थांबले आहे. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या 286 जागा रिक्त आहेत. त्याचा फटका राज्यातील मोठमोठ्या प्रकल्पांना बसत आहे. कार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता आदी "वेटिंग'वर आहेत. राज्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता हीच महत्त्वाची पदे रिक्तच आहेत. शासनाचे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरत आहे.
 
अनेक वर्षांपासून शासनाच्या जलसंपदा विभागात भरतीप्रक्रिया झाली नसल्याने जलसंपदा विभागात 50 टक्के पदे रिक्त आहेत. या 50 टक्के रिक्त पदांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे देत चालवला जात आहे. अतिरिक्त पदभारामुळे अधिकारी वर्गावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यातच जलसंपदा विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील 286 अभियंत्यांची बढती प्रक्रिया रखडली आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता या पदांचा समावेश आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीने दिवाळीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध संवर्गातील 250 अभियंत्यांचे पदोन्नतीचे आदेश काढले. जलसंपदा विभागातील अभियंत्यांना डावलल्याने पदोन्नती मिळणाऱ्या जलसंपदा विभागातील अधिकारी वर्गात नाराजी आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील बढती मिळणाऱ्या सर्व आधिकाऱ्यांना बढती देण्यात येईल, असे आश्‍वासन देणाऱ्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन हे "बोलाची कढी व बोलाचाच भात' ठरले आहे.
 
जलसंपदा विभागातील कोयना प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता ते महासंचालकाची चार पदे, अधीक्षक अभियंता ते मुख्य अभियंत्याची चार पदे, कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंत्याची आठ पदे, उपविभागीय अभियंता ते कार्यकारी अभियंत्याची 58 पदे, कनिष्ठ अभियंता ते उपविभागीय अभियंत्याची 212 पदे अशी एकूण 286 पदे बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचा फटका राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना बसत आहे.

खूशखबर... कोयनाग्रस्तांना मिळणार नोकरी

सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्याकडे कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहा महिन्यांपूर्वी देण्यात आला आहे. श्री. गुणाले यांची या पदावर पदोन्नतीने रितसर नेमणूक होणार आहे. गुणाले यांची पदोन्नतीची फाइल कुलप बंद आहे, तर कोयना प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांची बदली सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्पात झाल्याने त्यांना 13 ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तरीही त्यांच्याकडे कोयना प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार होता. 15 ऑक्‍टोबरला ते या कार्यभारातून मुक्त झाले आहेत. त्यांच्याकडे असणारा अतिरिक्त कार्यभार कोयना बांधकाम विभागाचे श्री. फाळके यांच्याकडे देण्यात आला आहे. या पदावर नियुक्ती होणारे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांची फाइल बढती प्रक्रियेत आहे. 

गेल्या पाच महिन्यांपासून या नियुक्‍या रखडल्या आहेत. काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. 

- संजय घाणेकर, सचिव, जलसंपदा विभाग

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शेखर गोरे, प्रभाकर देशमुख यांची भूमिका ठरणार निर्णायक 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred Eighty Six Post Vacant In Water Resources Department Jayant Patil Maharashtra News