VIDEO : पहाटेच्या शपथविधीनंतर काय म्हणाले होते फडणवीस?

VIDEO : पहाटेच्या शपथविधीनंतर काय म्हणाले होते फडणवीस?
Summary

पहाटेच्या या शपथविधीने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. अर्थात हे सरकार अडीच दिवसच टिकले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले.

महाराष्ट्रात आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीने महाराष्ट्रासह देशाला आश्चर्याचा धक्का बसला होता. राज्यात युतीची चर्चा फिसकटल्यानतंर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तेच्या हालचाली सुरु केल्या होत्या. अगदी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासह इतर सर्व चर्चांना मूर्तरूप आले असताना अचानक झालेल्या या शपथविधीने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. कोणालाही कसलीच कल्पना नसताना हा शपथविधी झाल्याच्या बातम्या माध्यमातून झळकल्या. खरंतर तेव्हा पाच वर्षे आम्ही स्थिर सरकार देऊ असा दावा करणाऱ्या फडणवीस यांचे सरकार फक्त अडीच दिवस टिकले होते. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकाही झाली होती. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीबद्दल अनेकदा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वेळ आल्यावर बोलू असंही फडणवीस बोलले आहे. मात्र एकदा जाहीरपणे त्यांनी मनातील भावना बोलताना हा शपथविधी म्हणजे चूक असल्याचं म्हटलं होतं.

फडणवीस यांचा शपथविधी त्यानंतर उद्धव ठाकरेंचा शपथविधी, महाविकास आघाडीचे सरकार यादरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत. याकाळात महाविकास आघाडीवर अनेक आरोप झाले. त्यांच्या काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. भाजपकडून आमचं सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सातत्यानं होत असल्याचे आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहेत. दरम्यान, आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला दोन वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा म्हटलं होतं की, सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा आम्हाला दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांचे आभार. खरे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने एक अतिशय स्पष्ट जनादेश दिला होता. तो जनाआदेश मिळाल्यानंतर आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने जनादेश न पाळता इतर पक्षांसोबत जाण्याच्या संदर्भात चर्चा सुरू केली. आणि या चर्चेमुळे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊ शकलं नाही. त्यामुळे राष्ट्रपती शासन लावण्याची वेळ आली.

राज्यात निकाल लागल्यानंतरही सरकार स्थापनेच्या हालचाली होत नव्हत्या. तसंच तसा दावा करण्याआधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले होते की, अनेक दिवस राष्‍ट्रपती शासन लागू केल्यानंतर देखील एक खिचडी अशा प्रकारचा सरकार तयार करण्याचा प्रयत्न अधिकारी सुरू होता. ते स्थिर सरकार चालवू शकत नाहीत. या महाराष्ट्राला एक स्थायी सरकार मिळालं पाहिजे यासाठी राष्ट्रवादीचे अजित दादा पवार यांनी आमच्यासोबत येणाचा हा निर्णय घेतला. ते जनता पक्षाला समर्थन देतील सरकारमध्ये येतील आणि काही अन्य पक्षांचे पक्ष समर्थन आहे. आम्ही या समर्थनाच्या भरोशावर आमचा दावा माननीय राज्यपालांकडे दाखल केला असेही फडणवीस यांनी सांगितले होते.

VIDEO : पहाटेच्या शपथविधीनंतर काय म्हणाले होते फडणवीस?
मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली की त्याचा सरकार तयार होऊ शकतं आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतल्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी आज आम्हाला शपथ विधी करता बोलवलं. याठिकाणी मुख्यमंत्रीपदाची मी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची दादांनी शपथ घेतली आहे. मी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रासमोर आव्हानं आहेत. त्यांचा सामना आम्ही अत्यंत समर्थपणे करून पाच वर्ष हे सरकार पूर्ण ताकदीने आम्ही चालवू. जनतेच्या हिताकरता हे सरकार चालेल. विशेषत शेतकऱ्यांवर संकट आहे त्यांच्यासाठी काम करू. जनादेश आहे त्याचा सन्मान झाला असता. खरं वचन आम्ही जनतेला दिलं होतं. ते म्हणतात दिलं आम्ही म्हणतो नाही, या चर्चेपेक्षा जनतेकडे जाताना आम्हाला निवडून द्या आम्ही एकत्र सरकार चालवू पण या वचनाचा भंग झाला. आमच्या ऐवजी दुसऱ्याकडे गेल्यानंच ही राष्ट्रपती राजवट लागली. आज हा निर्णय आम्हाला हिताकरता निर्णय घ्यावा लागला. जनता याचं स्वागत करेल आणि अत्यंत स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्राला देऊ याचा आम्हाला विश्वास आहे असंही फडणवीस म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com