“सेटलमेंट करणारे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत का? हा प्रश्न पडतो”

सिद्धार्थ लाटकर
Friday, 9 October 2020

'वंचित' चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाचा साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी तसेच काेल्हापूरात संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी निषेध नाेंदवून आंबेडकरांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.

सातारा :  मराठा आरक्षणावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भाेसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली, एक राजा बिनडोक अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काेणाचे ही नाव घेता टीका केल्याने त्याचे पडसाद राजेप्रेमीतून उमटले.

राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष नितीन शिंदे यांनी देखील प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले उदयनराजेंनी आजपर्यंत कधीच कोणत्या व्यक्तीचं काम करताना जातीधर्म पाहिला नाही. दाेन दशके झाली आम्ही राजेंसोबत काम करतोय, जो व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदत करण्याचा राजेंचा स्वभाव आहे. साध्या कार्यकर्त्याचं कामही प्रकाश आंबेडकरांनी केलं नाही, वंचित समाजाचे प्रश्न उदयनराजे संसदेत मांडतील यासाठीच त्यांना खासदारकी मिळाली, राजेंवर टीका करायची आणि काम करतोय दाखवायचं हे काम प्रकाश आंबेडकर करतायेत, यापुढे असं वक्तव्य कराल तर उदयनराजे समर्थक तुम्हाला फिरू देणार नाहीत असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

छत्रपतींच्या वारसदारांचा अपमान कदापि सहन करणार नाही : गृहराज्यमंत्री

खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांच्यावर जे आक्षेपार्ह विधान केले गेले त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो, ज्या छत्रपतींनी सर्व जाती धर्म एक करून हिंदवी स्वराज्य उभे केले तेच काम आजचे छत्रपती करत आहेत त्यांनी कधीही जाती धर्म पाहून कामे केली नाहीत किंबहुना कोणत्याही जाती धर्मावर टीका केली नाही.

हा वारसा ही शिकवण छत्रपतींची आहे आणि आज त्यांच्याच वंशजांवर तुम्ही टीका करत आहात, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत आणि त्याचे वंशज खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे हे आहेत त्यांच्या बद्दल बोलताना आदब राखली गेलीच पाहिजे असे माजी नगरसेवक राजू गाेडले यांनी नमूद केले. ते म्हणाले, मी खासदार उदयनराजे महाराजांचा निष्ठावंत मावळा म्हणून या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. खासदार उदयनराजे यांच्याबरोबर गेली वीस वर्षे मी सामाजिक व राजकीय कार्य करत आहे त्यांनी कधीच कुठल्या जातीपातीचे राजकारण केले नाही. प्रकाश आंबेडकर हे त्यांची राजकीय उंची वाढवण्यासाठी आमच्या राजांवर बेताल वक्तव्य करीत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही हे लक्षात असू द्यात असेही गाेडसेंनी नमूद केले.

प्रकाश आंबेडकरांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी : नरेंद्र पाटील 

साता-यातील जिल्हा परिषदचे माजी सदस्य संदीप शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांचा वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तसेच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत संदीप शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर कधीही कार्यकर्त्यांना सन्माने जय भीम बाेलत नाहीत. त्यांना एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. ज्या महामानवाने या देशाला घटना दिली, त्यांचा नातू म्हणूनही तुमची ओळख निर्माण करता आली नाही, महाराष्ट्रात कुठेही उमेदवारी देताना प्रकाश आंबेडकर सेटलमेंट करतात हा आरोप आहे, आम्ही आरपीआयमध्ये काम करतानाही हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हेदेखील आम्हाला माहिती नव्हते. ते कार्यकर्त्यांना सन्मानाने जय भीम बोलत नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कधीही पुष्पहार घालत नाही, त्यामुळे बाबासाहेबांचे नातू आहात का? असा प्रश्न पडतो अशी टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या एक राजा बिनडोकचा राजेप्रेंमींनी नाेंदविला निषेध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Followers Condemn Prakash Ambedkar Statement Satara News