आता मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाणार : उद्धव ठाकरे

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

मला तुमच्या सोबतीची गरज

- मी घाबरणारा नाही

मुंबई : आखाड्यात पहिल्यांदा उतरत आहे. पण आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ व्यक्ती आहेत. आपल्या सरकारमध्ये तीन पक्ष असले तरी आता हमरीतुमरी करायची नाही. हे आपलं सरकार आहे. सर्वसामान्यांना वाटलं पाहिजे हे आपलं सरकार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच आता मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या भावाला भेटायला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडीच्या नेतेमंडळींची बैठक आज पार पडली. त्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, विजयानंतर आता बाळासाहेबांची आठवण येत आहे. आमचा हा संघर्ष व्यक्तिगत नाही. आमचं काही ठरलं नव्हतं असे ऐकल्यानंतर मला वाईट वाटले. 'मातोश्री'वर जे आले ते आता खोटं बोलत आहेत. तिन्ही पक्ष जरी एकत्र आले तरी मला खोटं चालत नाही. एकदा शब्द दिला तर प्राण गेला तरी चालेल. 

तसेच पवारासाहेबांनी बाळासाहेबांची आणि माँची आठवण काढली. ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्या मी नक्की लक्षात ठेवेन. तीन विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत. एकमेकांवर विश्वास ठेवून नवी दिशा आपण ठरवणार आहोत. ज्यांच्याशी 30 वर्षे मैत्री ठेवली त्यांनी विश्वासघात केला, पण ज्यांच्याशी 30 वर्षे सामना केला त्यांनी विश्वास ठेवला. या ताकदीचा उपयोग सामान्यांसाठी करणार आहे. मला सोनियाजींनाही धन्यवाद द्यायचे आहे. आपण सगळे मैदानातील माणसं आहोत. सरकारमध्ये हमरीतुमरी नको. 

मी घाबरणारा नाही

तुमच्याशी कोठेही बोलायला तयार आहे. मी लढणारा आहे, घाबरणारा नाही. 'मातोश्री'चा सन्मान तुम्ही ठेवला नाही, त्यामुळे मला बाहेर जावे लागले. शब्द खूप महत्त्वाचा असतो, हे बाळासाहेबांनी सांगितले होते.

मला तुमच्या सोबतीची गरज

आपण सगळे एकत्र आहोत. खोट्याची साथ कद्यापि देणार नाही. मला तुमच्या साथीची, सोबतीची गरज आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray comment after declares his name for Maharashtra CM Post