
कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या जागेवर सेनेचाच हक्क आहे.
कोल्हापूर उत्तर अखेर काँग्रेसलाच; मुख्यमंत्र्यांचा बैठकित निर्णय
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील (Kolhapur North Election) जागेवर शिवसेना (Shivsena) व काँग्रेस (Congress) या महाविकास आघाडीतील दोन पक्षांतच चुरस निर्माण झाली आहे. मुंबईत काल (ता. १७) झालेल्या बैठकीत दोन्हीही पक्षाचे नेते आपआपल्या भुमिकेवर ठाम होते, तथापि आज सायंकाळी ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेस विरूध्द भाजप असा सामना रंगणार आहे.
कोल्हापूर उत्तरमधून २०१९ मध्ये काँग्रेसचे कै. चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. या जोरावर ही जागा काँग्रेसलाच द्यावी असा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा आग्रह आहे. दुसरीकडे पाचवेळा ही जागा जिंकल्याने या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याची भुमिका सेना नेत्यांची आहे. या पार्श्वभुमीवर बुधावारी (ता. १६) दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक मुंबईत (Mumbai) ठेवण्यात आली होती, पण त्या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित नसल्याने निर्णय झाला नाही. काल (ता. १७) पुन्हा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीला शिवेसनेचे मंत्री उदय समंत, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुश्रीफ, पालकमंत्री पाटील आदि उपस्थित होते.
कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या जागेवर सेनेचाच हक्क आहे. पाचवेळा या मतदार संघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. आता जागा सोडली तर पुन्हा २०२४ मध्येही काँग्रेसच यावर दावा करेल, त्यातून शिवसेनाच शहरातून नाहीशी होईल. म्हणून ही जागा सेनेला सोडावी अशी भुमिका देवणे यांनी मांडली. त्याला पालकमंत्री पाटील यांनी विरोध केला. २०१९ मध्ये काँग्रेसचा उमेदवार या मतदार संघातून विजयी झाल्याने या जागेवर काँग्रेसचाच हक्क आहे. ज्या मतदार संघात अशी परिस्थिती येते त्याठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असतो, त्या पक्षालाच ही जागा दिली जाते असा दावा पाटील यांनी करून ही जागा काँग्रेसलाच द्यावी असा आग्रह धरला. दोन्ही पक्षाचे नेते आपआपल्या मतांवर ठाम राहील्याने हा प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नेण्याचे ठरले.
बैठकीला उपस्थिती मंत्री उदय सामंत व दुधवडकर यांच्यावर ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले. आज दुपारी या दोघांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन वृत्तांत सांगितला. त्यानंतर सायंकाळी ठाकरे यांनी उत्तरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
मैत्रीपूर्ण लढतीलाही विरोध
मुंबईतील बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत करावी असा प्रस्ताव सेनेच्या नेत्यांनी ठेवला. पण त्यालाही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. आता भाजप-काँग्रेस लढतीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भुमिका महत्त्वाची ठरणार असून याचा फायदा कोणाला होणार हे निकालातून स्पष्ट होईल.
शिवसेनेचा बालेकिल्ला
या मतदार संघातून १९९०, १९९५, १९९९, २००९ व २०१४ अशा पाचवेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असावा यासाठी सेना नेत्यांचे प्रयत्न सुरू होते, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनीच ही जागा काँग्रेसला सोडल्याने भविष्यातील शिवसेनेच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह उभे रहाणार आहे.