Pune शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणेचा उद्धव ठाकरेंना विसर का पडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray forget announcement help  farmers  Abdul Sattar

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा सवाल : राजकारणासाठी बांधावरील फोटो

शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणेचा उद्धव ठाकरेंना विसर का पडला

पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. त्या मदतीच्या घोषणेची उद्धव ठाकरे यांना आता आठवण का नाही राहिली, असा सवाल राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढल्याची टीका सत्तार यांनी यावेळी ठाकरे यांच्यावर केली.

फलोत्पादन मूल्यसाखळी क्षमतावृद्धी व संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी ते पुण्यात आले होते. या समारंभापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला. उद्धव ठाकरे हे नुकतेच औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यासंदर्भात सत्तार यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनी हा सवाल करत ठाकरे यांच्या या दौऱ्यावरही टीकास्त्र सोडले.

सत्तार म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा अडीच तासांचा होता. त्यामध्ये ते केवळ चोवीस मिनिटे शेतकऱ्यांच्या बांधावर होते. राजकारणासाठी बांधावर जाऊन छायाचित्रे काढणे वेगळे आहे. पण मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे यांनीही परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

या घोषणेची त्यांना आता आठवण का राहिली नाही. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत परतीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. राज्यातील एकही शेतकरी पिकांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी खबरदारी राज्य सरकार घेत आहे.’’

आपत्ती निवारण निधीतून नुकसान भरपाई

राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून (एसडीआरएफ) नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हा निधी कमी पडल्यास केंद्र सरकार राज्य सरकारला आर्थिक मदत करेल,’ असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.