काटेरी आव्हानांचा मुकुट उद्धव ठाकरे यांच्या शिरी 

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेले मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे ही ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्‍ती आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर सर्वांत प्रथम ठाकरे यांना सहा महिन्यांच्या आत विधान परिषद अथवा विधानसभेवर निवडून यावे लागेल.

मुंबई - मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून राज्याच्या कोणत्याही प्रश्‍नाशी निगडित बाबीचे उत्तरदायित्व घेणे, नोकरशाहीवर मजबूत कमांड ठेवणे, तसेच सत्तेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस पक्षांचे श्रेष्ठी, मंत्री, नेते, पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधत शिवसेनेचा पक्षविस्तार करणे, भविष्यातील राजकीय गणिताचे आरखडे मांडत विरोधी बाकावरील भाजपशी यशस्वी संघर्ष करणे, अशा एक नव्हे तर अनेक आव्हानांचा काटेरी मुकुट महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिरावर आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेले मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे ही ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्‍ती आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर सर्वांत प्रथम ठाकरे यांना सहा महिन्यांच्या आत विधान परिषद अथवा विधानसभेवर निवडून यावे लागेल. शपथविधी झाल्यानंतर त्यांना लगेच मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा घेऊन कामास सुरुवात करावी लागणार आहे. पक्षीय संघटनेतील अनुभव गाठीशी असलेल्या उद्धव यांना प्रशासकीय पातळीवर अनुभव वेगाने जमवावा लागेल. त्यांच्याबरोबर वित्त, विकास सेवा, आरोग्य, विधिमंडळ, मंत्रालय केडरचे अधिकारी आदी क्षेत्रातील मात्र अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांचा भरणा करावा लागेल. खासगी सचिव म्हणून क्षेत्रीय पातळीवर काम केलेल्या महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाचारण करावे लागेल. 

सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा ही घोषणाच आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले मेट्रोसारखे प्रकल्पाची कामे न खोळंबता निधी गोळा करणे, केंद्रात एकेकाळचा सहकारी पक्ष सत्तेत असला, तरी उभा संघर्ष असल्यामुळे केंद्राची मदत मिळवणे आणि राज्याला गतवैभव मिळवून देणे, हे सर्वांत मोठे आव्हान मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मंत्रिमंडळ तीन पक्षांचे आणि तीन भिन्न विचाराचे आहे. समान कार्यक्रम राबवणे, यावर एकमत होऊन हे तीन पक्ष सत्तेत सामील झाले आहे. किमान समान कार्यक्रम राबविताना राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाचे हायकमांड दुखावणार नाही, याची दखल घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांत समन्वय साधत शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कॉंगेस-राष्ट्रवादी-घटक पक्षाचे सर्वच जण यांना चुचकारत शिवसेना पक्षविस्तार करण्याचे फार मोठे आव्हान उद्धव यांच्यासमोर आहे. 

अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

राज्यातील 11 कोटी जनतेला मुख्यमंत्री म्हणून सामोरे जाताना स्वपक्षातील, मित्रपक्षातील नाराजी ओढावली जाणार आहे. ती दूर करावी लगणार आहे. तसेच ज्यांच्याशी 30 वर्षे मैत्री केली त्यांच्याशी म्हणजे विरोधी पक्ष म्हणून भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. हे करत असताना पक्षाची ओळख जिवंत ठेवावी लागणार आहे, अशी आव्हाने उद्धव यांच्यासमोर "आ' वासून उभी आहेत. त्यातून त्यांना मार्ग काढावा लागणार आहे. 

प्रशासकीय आव्हाने 
- पूर्णवेळ द्यावा लागणार आहे. 
- मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज समजून घेणे. 
- आयएएस, आयपीएस दर्जाच्या विश्‍वासू अधिकाऱ्यांचा फौजफाटा तयार करणे. 
- महसुली प्रशासन समजून घ्यावे लागणार आहे. 
- सरकारी, खासगी तसेच प्रत्येक क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञांची टीम तयार करावी लागणार आहे. 

आर्थिक पातळीवर 
- केंद्राकडून निधी आणणे 
- राज्याच्या तिजोरीत खडखडाट 
- शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा 
- राज्याचे औद्योगिक गतवैभव परत मिळवणे 

राजकीय पातळीवर 
- सत्तेतील सर्व पक्षांत समन्वय साधणे 
- सत्तेतील सर्व पक्षांच्या हायकंमाडची मर्जी संभाळणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray new government challenges