
Uddhav Thackeray : 'घाईगडबडीने चित्र रंगवायचं अन् म्हणायचं, हे तुझे वडील' ठाकरेंची तोफ
मुंबईः शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती निमित्त ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा संपन्न झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, खोक्यांनी फक्त गद्दार विकले जाऊ शकतात, जे समोर दिसतात ते नव्हे. ते म्हणतील आमूक देशाचे पंतप्रधान भेटले, तमूक देशाचे पंतप्रधान भेटले. पण मी सांगतो, मलाही थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटले आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. एवढं काय अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी मिंदे गटात प्रवेश केला तर आश्चर्य वाटू देऊ नका, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला.
चित्रकाराला वेळ दिला का?
आज विधिमंडळामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण झालं. त्यावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या कोणी चित्रकाराने बाळासाहेबांचं चित्र काढलं असेल त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु त्यांना तितका वेळ सरकारने दिला का? घाईगडबडीत काहीतरी रंगवून ठेवायचं आणि म्हणायचं हे तुझे वडील. हे चूक आहे. त्यांनी तैलचित्र लावलं असलं तरी त्यांचा हेतू वाईट आहे, असं ठाकरे म्हणाले.
आरती मोदींची आणि चेहरा बाळासाहेबांचा
एकनाथ शिंदेंबद्दल बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे एकीकडे मोदींची आरती करतात, चेहरा बाळासाहेबांचा लावतात आणि शरद पवारांनाही गोड म्हणतात. त्यांना मोदींच्या नावावर मतं मागण्याची हिंमत नाही त्यामुळे ते असं करत असल्याचं ठाकरे म्हणाले. मला म्हणाले शरद पवारांचं ऐकतात. काल त्यांनीच शरद पवारांना सगळं विचारत असल्याचं जाहीर केलं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजू नका
मुंबई महानगर पालिकेला सर्वात मोठं बजेट असलेली संस्था बनवलं. मुंबईचा विकास केला. मात्र हे लोक आता मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजत आहेत. मुंबईचं वाट्टोळ करण्यासाठी यांच्या खेळ्या सुरु असल्याचं ठाकरे म्हणाले. परंतु मराठी माणसाने रक्त सांडलेली मुंबई आम्ही लुटू देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.