Uddhav thackeray : सरकारकडे भावनांचा दुष्काळ ; ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

Uddhav thackeray : सरकारकडे भावनांचा दुष्काळ ; ठाकरे

औरंगाबाद : ‘बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला. दिवाळी साजरी होत असताना शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. मात्र, नुसत्या घोषणांची अतिवृष्टी करणाऱ्या उत्सवी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. त्यामुळे त्यांना राज्यातला ओला दुष्काळ दिसत नाही,’ असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. हाती असलेला आसूड आता शेतकऱ्यांनी वापरावा आणि सरकारला पाझर फोडा; पाझर फुटत नसले तर घाम फोडावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कालबाह्य झालेले ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी’चे (एनडीआरएफ) निकष बदलण्याची गरज व्यक्त करून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

या हंगामात पावसाने सरासरीओलांडली. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यावर परतीच्या पावसानेही तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके वाया गेली. ऐन दिवाळीत हे संकट उभे राहिले. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी रविवारी गंगापूर तालुक्यातील दहेगाव व पेंढापूर शिवारात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पेंढापूर शिवारात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘कोणत्याही बाबीचा उत्सव आणि घोषणांची अतिवृष्टी करणारे हे राज्यातील सरकार आहे.

उत्सव साजरे करताना राज्यातील प्रजा समाधानी आहे का, हे तरी पहा. दहेगाव, पेंढापूरमधली स्थिती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तरीही कृषिमंत्री ओल्या दुष्काळाच्या निकषांबाबत बोलत आहेत. ओल्या दुष्काळासंदर्भात आणखी काय निकष आहेत? सरकारकडे

भावनांचा दुष्काळ असल्याने त्यांना राज्यातला ओला दुष्काळ दिसत नाही. आता काय यांना चिखलात बुचकळायचे?’

देवेंद्र फडणवीस यांना टोला

‘पुण्यात पाऊस पडला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात महापालिकेला विचारून पाऊस पडत नाही. आता ग्रामीण भागात पाऊस पडला तर, ‘आम्हाला विचारून पडला नाही’, असे ते म्हणतील. त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे तयार असतात,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. माझ्याशी गद्दारी केली ठीक आहे, बळीराजाशी तरी गद्दारी करू नका, असा टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.