पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उद्धव येणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

शिवस्मारकाचे भूमिपूजन; निमंत्रणाचा लखोटा घेऊन मंत्री मातोश्रीवर
मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर धडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारे भूमिपूजन आणि जाहीर सभेला ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

शिवस्मारकाचे भूमिपूजन; निमंत्रणाचा लखोटा घेऊन मंत्री मातोश्रीवर
मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर धडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारे भूमिपूजन आणि जाहीर सभेला ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

इंदू मिलचे भूमिपूजन आणि मेट्रो प्रकल्पाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी भाजपने ठाकरे यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले होते. हीच परिस्थिती शिवस्मारक भूमिपूजनाच्या वेळी निर्माण करण्याची खेळी भाजपच्या काही नेते मंडळींकडून खेळण्यात येणार होती, मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन ठाकरे यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याने मानापमान नाट्यावर अखेर पडदा पडला.

भूतकाळातील अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीदेखील याच दिवशी शहापूर येथील कार्यक्रम स्वीकारून भाजपला बुचकळ्यात पाडले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांतील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यात भाजप मंत्र्यांना आज यश आले. अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो, जेव्हा अंतर निर्माण झालेले असते, मात्र शिवसेना-भाजपमध्ये अंतर नाहीच असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमावर भाजपचीच छाप
शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्यभर प्रसिद्धी मिळावी यासाठी राज्य सरकारने शासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. 24 डिसेंबरला मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे फ्लेक्‍स सरकारी कार्यालय, रेशन दुकान, शाळा आणि महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. याच्या खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे फ्लेक्‍स 20 डिसेंबरपासून लागलेले असतील याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शिवस्मारक कार्यक्रमाची रूपरेषा
- दुपारी 3 वाजता
जलपूजनाचा कार्यक्रम - कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत राज्यपाल, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुभाष देसाई, मुंबईच्या महापौरांची उपस्थिती
- दुपारी 3.30 वाजता
बांद्रा-कुर्ला संकुल येथे "स्वप्नपूर्ती सभा' व मेट्रो 4 चे उद्‌घाटन - सभेत पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांची भाषणे, विनायक मेटे यांचे आभारपर भाषण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray present to shivsmarak inauguration