राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

हॉटेल सुरु करायला काही अडचण नाही. मात्र, राज्य सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेलमध्ये आहेत त्यांना काढू नका.

मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती तयार केली असून ती अंतिम झाल्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. 

राज्यातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल तसेच लॉज सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे.’’ 

‘‘हॉटेल सुरु करायला काही अडचण नाही. मात्र, राज्य सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेलमध्ये आहेत त्यांना काढू नका. याबाबत आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनानंतर हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्त ठेवणे महत्त्वाचे आहे. 
- आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री 

हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. 
- अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार 

हॉटेल उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे. 
- गुरुबक्ष सिंग, इंडियन हॉटेल्स असोसिएशन 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल उद्योजकांचे म्हणणे... 
- विजेची देयके कमी करावीत. हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावी. 
- हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीतकमी मर्यादा असावी 
- हॉटेल आणि रेस्टॉरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी. 
- हॉटेलमधील सुविधांचा वापर उद्योग आणि व्यवसायासाठीही होऊ शकतो 
- कोविड सुविधेसाठी घेतलेल्या हॉटेलसाठी किमान मोबदला मिळावा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray said that he is planning to start a hotel and a restaurant