उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद करावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

विखे-पाटील, अजित पवार यांची टीका

विखे-पाटील, अजित पवार यांची टीका
सांगली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल खोटा कळवळा दाखवणाऱ्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची अवस्था विनोदी नटासारखी झाली आहे. सत्तेतून बाहेर पडण्याची नौटंकी त्यांनी बंद करावी. त्यांची कृती विनोदी नटासारखी झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची इच्छा असती तर त्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मंजूर करून त्याची अंमलबजावणी करायला हवी होती. मात्र, त्यांच्याकडून केवळ राजीनाम्याचे नाटक सुरू आहे, अशा शब्दांत आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही शिवसेनेवर हल्ला चढवला.

'सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जीएसटीसाठी विशेष अधिवेशन घेण्यास तयार आहे. मात्र, कर्जमाफीसाठी नाही. त्यामुळे कर्जमाफी व वीज दरवाढीबाबत विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे विखे-पाटील व पवार यांनी सांगितले.

विखे-पाटील म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात राज्यातील सर्वांत भ्रष्ट महापालिका आहे. त्यांना निवडणुकीवेळी कर्जमाफी आठवली. सत्ता आल्यावर ते विसरले. सुरक्षाकवच मिळावे म्हणून ते सत्ता सोडण्यास तयार नाहीत. एका खासदाराला विमान प्रवास मिळावा, यासाठी शिवसेनेचे खासदार लोकसभेत उड्डाणमंत्र्यांच्या अंगावर धावून जातात. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का धावत नाहीत.''

दारूबंदीची तूट न पिणाऱ्यांकडून का?
अजित पवार म्हणाले, '21 रुपये मूळ दर असणाऱ्या पेट्रोलवर 51 रुपयांचा कर आहे. दारूबंदीच्या माध्यमातून झालेली तूट भरून काढण्यासाठी उद्योग केला आहे. दारू न पिणाऱ्यांकडून कर वसूल करताना सरकारला लाज कशी वाटत नाही. हे सरकारचे अपयश आहे.''

संपूर्ण तूर खरेदी करा
तूर उत्पादकांना सरकारने संकटात आणले आहे. 22 एप्रिलपर्यंत टोकन घेणाऱ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, ज्यांचा पेरा उशिरा आहे, त्यांनी काय करायचे. सरकारने तूर खरेदीसाठी एक तारीख निश्‍चित करून शेतकऱ्यांना नोंदणी करून पुन्हा तूर खरेदी करता येऊ शकते. सरकारला 5050 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे सर्व तूर खरेदी करावी. हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केलेल्यास बोनस द्यावा, अशी मागणी श्री. पवार यांनी केली.

स्वाभिमानी शब्द वगळा!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी आता शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत. दोघेही ब्रसुद्धा काढत नाहीत. त्यांना "स्वाभिमानी' म्हणणे शोभत नाही. तो आता वगळावा, असे टोला विखे-पाटील यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray should stop the drama