
"फुकटात करमणूक मिळतेय तर..."; उद्धव ठाकरे राज यांच्यावर बरसले
राज ठाकरेंची औरंगाबादमधली सभा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या भूमिका बदलावर टीकास्त्र सोडलं आहे.
'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातल्या सध्याच्या घडामोडींवर आपली भूमिका मांडली. यावेळी ठाकरे म्हणाले, हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात हे आत्तापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ करणारे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत.
नाव न घेता राज ठाकरेंना खोचक टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले, "दोन वर्षांचा मोठा कालखंड गेला आहे. या काळात कोरोनामुळे नाटक, सिनेमा सगळं काही बंद होतं. त्यामुळं आता जर फुकटात करमणूक होत असेल तर का नको? शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे मी विधानसभेतही बोललोय, ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करून बघू, ते करून बघू असं म्हणतायत. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात नाही आवडलं तर परत करा असं आहे. तसंच हे फळलं तर ठीक नाही तर परत गाजराची पुंगी वाजली तर वाजली. असं भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिलेत".