esakal | उद्धव ठाकरेंच्या 35 मिनिटांच्या भाषणात शिवसेनेची आश्‍वासन थाळी (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray speak in dasara melava 2019

आज एक आणि दुसऱ्यांदा विधानसभा निकालाच्या दिवशी अशी यावेळेस दोन वेळा विजयादशमी साजरी होणार असल्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.08) शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या 35 मिनिटांच्या भाषणात शिवसेनेची आश्‍वासन थाळी (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राम मंदिर, समान नागरी कायदा, बांगलादेशींची हकालपट्टी, धनगर आरक्षण या नेहमीच्याच मुद्द्यांबरोबर भाजपशी केलेल्या युतीमागील कारणमीमांसा असे "विचारांचे सोने' लुटतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 8) दसरा मेळाव्यात अवघ्या महाराष्ट्रासमोर आश्‍वासनांची थाळीही परोसली. राज्यात भगवा फडकल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, गोरगरिबांना अवघ्या दहा रुपयांत अन्नाची थाळी, तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचा वीजदर 30 टक्‍क्‍यांनी कमी, राज्यात एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी बससेवा अशी महत्त्वाची आश्‍वासने उद्धव यांनी या सभेत दिली. 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव यांनी राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. राम मंदिरासाठी प्रसंगी विशेष कायदा करा, या मागणीचा पुनरुच्चार करतानाच त्यांनी भाजपशी युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली असल्याचे सांगितले. युती म्हटली की तडजोड आलीच. मात्र, आमची युती महाराष्ट्राच्या हितासाठी आहे असे ते म्हणाले. चांगला कारभार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही ते म्हणाले. मात्र, तत्पूर्वी शिवसैनिकांच्या पाठीत वार करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 

आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार यांनी ईडी प्रकरणावरून राज्यात सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार घेताना उद्धव यांनी, सुडाचे राजकारण सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला. मात्र त्याचबरोबर, आज सुडाचे राजकारण होत असेल तर 2000 साली तुम्ही काय केले होते, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. केवळ जुन्या अग्रलेखावरून बाळासाहेब ठाकरेंवर गुन्हा दाखल करणाऱ्यांनी सुडाच्या राजकारणाच्या गप्पा करू नयेत. तुम्ही सुडाचे राजकारण केले. यामुळे आमचे "टार्गेट' तुम्हीच राहणार, असे ते म्हणाले. ईडी प्रकरणानंतर अजित पवार यांच्या डोळ्यांत अश्रू झळकले होते. त्यांची नक्राश्रू अशा शब्दांत त्यांनी संभावना केली. 

काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, की आज काँग्रेस भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देणार असल्याचे सांगत आहे. स्वतः बेकार झाल्यावर त्यांना भूमिपुत्रांची आठवण झाली. काँग्रेसचा हा कळवळा म्हणजे थोतांड आहे. 

हा देश युवकांनी घडवला आहे. यामुळे युवकांनी आता पुढे यायला हवे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी या वेळी पुढच्या राजकारणाचे दिशादर्शनही केले. धनगरांना आरक्षण, "राष्ट्रप्रेमी' मुस्लिमांचे हक्क मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी या मेळाव्यात दिली. 

"आरे'ला कारे नाहीच!
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत धगधगत असलेल्या आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भूमिका घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आरेतील मेट्रो कारशेडला सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, या मुद्द्यावर त्यांनी मौनच पत्करले. नाणार प्रकल्पाचा फेरविचार करू असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याबाबतही उद्धव यांनी या वेळी चकार शब्दही काढला नाही. 

इशारे.. पण कुणाला?
"वचनं जनतेला दिलेली असतील, एकमेकांना दिलेली असतील, ही वचनं जर पाळणार नसू तर मग हे ढोंग करण्याचे काही कारण नाही. राममंदिर बांधायचं आणि वचनं तोडायची हे रामालाही पटणार नाही. राम म्हणेल रावणापेक्षा यांना मारलेलं बरं!'
"सूडाचं राजकारण कोणीही या महाराष्ट्रात करायला गेलं, तर तो कोणीही असला तरी त्याला छत्रपतींचा महाराष्ट्र आणि छत्रपतींची शिवसेना सहन करणार नाही अन्‌ त्याला करू देणार नाही. ती चिरडून तोडून मोडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.' 


दसरा मेळाव्यातील उद्धव यांच्या भाषणातील मुद्दे-
- देशावर प्रेम करणारे मुस्लिम आमच्या सोबत आहेत. मुस्लिम आमचे शत्रू नाहीत फक्त देशावर प्रेम करा.
- धनगर समाज आमच्या सोबत आहे. अन्यायावर वार करणारी काठी आणि तलवार असली पाहिजे.
- सत्ता तर मला पाहिजेच कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.
- मराठा आरक्षणांप्रमाणे धनगर समाज, मुस्लिम सोबत आले तर त्यांना ही न्याय मिळवून देऊ.
- शिवाजी महाराज यांच्यासोबत बारा बलुतेदार होते. शिवाजी महाराज केवळ पोवाडे बोलण्यापर्यंत नकोत.
- पाठीत कोणी वार करणार असेल तर वाघ नखांनी कोथळा बाहेर काढणारी ही शिवसेना आहे.
- काँग्रेसच्या मागे आपली ताकद कदाही लावणार नाही.
- महाराष्ट्रात जी युती स्वीकारली गेली ती युती उत्तरप्रदेशमध्ये का स्वीकारली गेली नाही.
- शिवसेनेला कोणीही वाकवू शकत नाही.
- एकतर मरेन अथवा मारेन ही शिवसेना आहे. 
- जो पर्यंत आम्ही आहोत तो पर्यंत शरद पवार, काँग्रेस यांना टार्गेट करत राहणार.
- अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण, मगरअश्रू ऐकले होते ते आम्ही पाहिले.
- अजित पवार म्हणतात आम्ही शेती करू पण धरणात पाणी नसेल तर काय करणार?- माझा शेतकरी डोळ्यात पाणी घेऊन आपल्याकडे येत होते तेव्हा तुम्ही काय केले.- सुडाचे राजकारण कोणी करता असेल तर शिवसेना ते सहन करणार नाही.
- शरद पवार यांच्यावर ईडीने खटला दाखल केला तर सुडाचे राजकारण सूरु आहे अशी अफवा पसरवली गेली.
- शरद पवार यांचे सरकार असतांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 2000 साली गुन्हा दाखल केला.
- गुन्हा असेल तर लटकवा फासावर ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती.
- परराज्यातील पोलिस आणत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शरद पवार यांनी दबाव आणला होता.
- नोकरी मध्ये भूमीपुत्रांना प्राधान्य हे राष्ट्रवादी काँग्रेसला बेकार झाल्यावर लक्षात आले का?
- शिवसेना या हक्कासाठी जेव्हा आंदोलन करायची त्यावेळी त्यांच्यावर याच काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने लाठीचार्ज केला होता हे विसरता कामा नये.
- आम्ही सरकार मध्ये राहणार आहोत.
- कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करणार.
- 10 रुपयात एक थाळी जेवण सरकार आल्यावर देणार.
- वीज बिल 30% कमी करणार.
- ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत बस सेवा देणार.
- एक रुपयात आरोग्य चाचणी सेवा देणार.
- युवा शक्तीला रोजगार मिळाला पाहिजे.
- युवा शक्तीची ताकद आपल्याकडे आहे पण ती कोणी वापरत नाहीत.