esakal | उद्धवराव, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री...
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धवराव, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री...

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला व्हावे.

उद्धवराव, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उद्धवराव, महाराष्ट्र तुमच्या निर्णयाची वाट पाहतो आहे. शिवसेनेची सत्ता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने आणि सहभागानेही येणार आहे. या सरकारचे नेतृत्त्व करायची संधी सोडू नका, मुख्यमंत्रिपद स्वीकाराच आणि संपवा एकदाचा सरकार कुणाचं आणि मुख्यमंत्री कोण यावर सुरू असलेला खेळ.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रातील सत्तापेच संपायची चिन्हे दृष्टिपथात आली असताना सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या सर्व पक्षांनी तुमच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब केलेच आहे, तर आता उद्धवराव मागं हटू नका. तुमच्या कल्पनेतला महाराष्ट्र, बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायची संधी दवडू नका. मुख्यमंत्रिपद स्वीकारा आणि शिवराज्य, रामराज्याची झलक राज्यातील जनतेला दाखवाच.

उद्धवराव, राज्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत कौल दिला. त्याला आता महिना होत आला. लोकांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बुहमत दिलं होतं. पण निवडणुकीआधी बंद दाराआड उद्धवराव तुमचं आणि भाजपच्या अमित शहांचं काही ठरलं होतं, ते काय ठरलं? यावरचे तुमचे मतभेद युतीचा संसार मोडणारे ठरले.

दोन्ही पक्षांनी एकमेकांना खोटारडं ठरवलं. दीर्घकाळाचा संसार मोडताना होतो तसला सारा आरडाओरडा तुम्ही केलाच. भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यानं अखेर संसदेतील शिवसेनेच्या खुर्च्या विरोधी गटाकडं ढकलून 'एनडीए'तून तुम्हाला बाहेरचा रस्ताही दाखवला तोवर तुमचं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत बोलणं सुरू झालं होतेच. तुमचे संजय राऊत तलवार परजून रोज भाजपवर वार करत होते, दुसरीकडं शरद पवारांना भेटत होते. त्यातून काही जमायला लागलं आहे. याची कुणकुण महाराष्ट्राला लागली होती.

आता हो नाही करत कॉंग्रेसनं तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही कॉंग्रेस आघाडीची धर्मनिरपेक्षताही स्वीकारली आहेच आणि शेवटी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, बेरोजगारांना संधी देण्यासाठी, राज्याचं संपूर्ण कल्याण करण्यासाठी आणि हो, भाजपचा अहंकार ठेचण्यासाठी एकमेकांना समजून तर घ्यायलाच हवं. तेवढं मोठं मन तुम्ही दाखवलंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडं तर व्यापक मन आहेच. तेव्हा आता तिन्ही पक्ष एकत्र येणार हे निश्‍चित आहे. तुमच्या वाटाघाटींचे भरपूर तपशील लोकांपर्यंत अखंडपणे पोचवले जातच आहेत. कोणत्या पक्षाला कुठली खाती, कोणाचे किती मंत्री आणि यात कुणाला संधी यावर सगळ्या महाराष्ट्रानं चर्वितचर्वण केलं आहे. आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष सरकार स्थापन होण्याची.

भाजपचे सुधीरभाऊ मुनगंटीवार गोड बातमी देतो म्हणता म्हणता थकून गेले. आता तुमचे राऊत गोड बातमी द्यायला रोज सरसावलेले असतात. एकदाची त्यांना ती देऊ द्या. त्यांनी तर कधीपासूनच सांगितलं आहे, तमाम शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदी बसलेलं पाहायचं आहे. शिवसैनिकच कशाला, सगळ्या जनतेचीच तशी इच्छा असल्याचेही राऊत कधीपासून सांगताहेत. तेव्हा आता इतक्‍या सगळ्यांची इच्छा पूर्ण कराच. यात अडचण असलीच तर तुमच्या नव्या मित्रांना तुमची उमेदवारी मान्य होईल काय? इतकीच होती. पण आता खुद्द शरद पवारच सांगताहेत की, सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावं, यावर सहमती झाली आहे आणि पाठोपाठ संजय राऊत तुमची तयारी असल्याचा दुजोराही देताहेत, तेव्हा आता तुम्ही स्पष्टपणे होय, "मीच मुख्यमंत्री होईन' असं जाहीर करून टाका आणि एकदाचा हा घोळ संपवा. 

अहो, उद्धवराव राज्यासमोर किती प्रश्‍न पडले आहेत, तुम्हाला तर ते माहितच आहेत. बांधावरच्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊन तुम्ही त्यांचे प्रश्‍नही समजून घेतले आहेत. तुम्हाला एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसवायचा होताच. हे तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे तुमच्या वडिलांनाच दिलेलं वचन आहे. आता हा शिवसैनिक म्हणजे तुम्हीच हे संजय राऊत सांगतातच. तेव्हा वडिलांना दिलेलं वाचन पाळायची केवढी मोठी संधी चालून आली आहे. एकतर शिवसेना वचनाची पक्की, हे तुम्हीच सांगता. त्यात हे वचन स्वतःच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं, म्हणजे ते पाळलंच पाहिजे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायची, विधिमंडळावर भगवा फडकवायची संधी त्यावर विचार नका करू, होय म्हणून टाका.

माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी, असं तुम्ही गरजत होता. भाजपवाल्यांनी नाही दिली सत्तेत असूनही, तुम्हाला काही करता आलं नाही. आता सत्ताच तुमची, तुम्ही मुख्यमंत्री झालात की कर्जामाफी, सातबार कोरा वगैरे बाबी किरकोळ आहेत. हे सगळे निर्णय तुमच्या शपथविधीचीच वाट पाहताहेत. बाकी दहा रुपयांत थाळी वगैरेही राबवायचं आहेच. भूमिपुत्रांना संरक्षण मिळायला हवे, महाराष्ट्राची अस्मिता जपायला हवी. आई तुळजाभवानीच्या कृपेनं, छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं एकदा का तुम्ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर राज्य करायला लागला की राज्याची भरभराट होईलच.

तुम्ही शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी अडून राहिलात आणि मुख्यमंत्रिपद थेट तुमच्याकडंच चालत आलं आहे, तेही तुम्हीच घ्यावं म्हणून शरद पवार यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे हे पद भूषविलेले आणि ते भूषवावं असं वाटणारे डझनभर नेतेही सहमत झाले आहेत. तर आता घेऊन टाका निर्णय. उद्धवराव, व्हाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! 

loading image