
त्यांना शिवसेनाप्रमुखही व्हायचंय
मुंबई - ‘‘त्यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुखही व्हायचे आहे. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागले आहेत. ही राक्षसी महत्वाकांक्षा असल्याचा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला आहे. एवढी तोडफोड करूनही यांचे समाधान होत नाह. आता ते आमची शिवसेना ही शिवसेना नाही, असे म्हणत आह कारण त्यांना शिवसेना संपवायची असल्याचा आरोपही ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यानंतर त्यांची मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त मंगळवारी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत ठाकरे यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच भाजपही आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की माझ्यावर काही महिन्यांपूर्वी जेव्हा शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी मानेत एक क्रॅम्प आली आणि मानेखालची हालचाल बंद झाली होती. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. तातडीने दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. अशाप्रसंगी मी ज्यांच्यावर पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, क्रमांक दोनचे पद दिले होते. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता त्यांच्याकडून पक्षाच्या विरोधात आणि सरकार पाडण्याच्या हालचाली जोरात सुरू होत्या, असा खळबळजनक आरोपही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
शिवसेनेला पुनर्वैभव मिळेल
शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे जे नाते आहे ते या पालापाचोळ्यांना तोडता येणार नाही. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीची वाट पाहत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाचे वर्णन पानगळ या एकाच शब्दात केले आहे. पानगळीनंतर झाडाला पुन्हा कोंब फुटतात आणि झाड पुन्हा हिरवेगार होते, असे सांगत ठाकरे यांनी शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेना संपवण्याचा डाव
त्यांचे उपमुख्यमंत्री बोलले की त्यांच्यासोबत जे लोक आहेत ते म्हणजेच शिवसेना. शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची. एकदा काम संपले की पालापाचोळा. तो टोपलीत भरला की नेऊन टाकायचा,’’ असे भाजपचा उल्लेख न करता हा सर्व भाजपचा डाव असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे म्हणाले...
ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केला. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून आवई उठवत आहेत. पण आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही
त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत
महाविकास आघाडीत काम करताना सभ्यता, समन्वय होता
महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. तसे झाले नाही. जनता आनंदी होती
कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केले. म्हणूनच देशातील पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझे नाव आले. जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझे नाव आले.
Web Title: Uddhav Thackerays Allegations Against Chief Minister Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..