‘उजनी’ उशाला, पण २६ वर्षे झाले सोलापूरकरांना ३-४ दिवसाआड पाणी, तेही अडीच तासच! समांतर जलवाहिनीचे काम थांबलेलेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply
‘उजनी’ उशाला, पण २६ वर्षे झाले सोलापूरकरांना ३-४ दिवसाआड पाणी, तेही अडीच तासच! समांतर जलवाहिनीचे काम थांबलेलेच

‘उजनी’ उशाला, पण २६ वर्षे झाले सोलापूरकरांना ३-४ दिवसाआड पाणी, तेही अडीच तासच! समांतर जलवाहिनीचे काम थांबलेलेच

सोलापूर : उजनीसारखे महाकाय धरण उशाला असतानाही २६ वर्षांपासून सोलापूर शहरातील नागरिकांच्या नशिबी तीन-चार दिवसाआड, तोही अडीच तासच पाणीपुरवठा आहे. तसूभर पाण्याच्या घोटासाठी खासकरून हद्दवाढ भागामधील नागरिकांची त्रेधातिरपीट कायम राहत आहे. सोलापूरकरांच्या कुंडलीत पुरेशा दाबाने आणि नियमीत पाणी पुरवठा मिळण्याचा योग नाहीच का? हाच येथील पाणी पुरवठ्यासंबंधीचा खराखुरा प्रश्‍न आणि वास्तव आहे.

काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या समांतर जलवाहिनीचे भूमिपूजन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी केले. मात्र, १२० किलोमीटर पाइपलाईनपैकी केवळ २० किलोमीटरपर्यंतच काम झाले आहे. सत्ता कोणीचीही असो, २७ वर्षांत सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कोणालाच सोडवता आलेला नाही, ३६५ दिवसांची पाणीपट्टी भरणाऱ्या बिचाऱ्या शहरवासीयांचे पाण्याचे भोग संपता संपत नाही हे विशेष.

खास बाब म्हणजे पाण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर प्रत्येकवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांनी सोईचे राजकारण केले. शहरवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाची खऱ्या अर्थाने कोणालाच चाड वाटली नाही. सोईच्या राजकारणाच्या चष्म्यातून पाण्याच्या विषयाकडे आजवर पाहिले गेले. परिणामी येथील जनतेचा घसा मात्र कोरडाच राहिला. बिचारे सोशिक सोलापूरकर पाण्याचे दु:ख, हाल सोसत राहिले. भविष्यात पाण्यासाठी आणखी काय अन्‌ किती सोसावे लागेल, याचे उत्तर कोणाकडेच नाही.

सन २०५० साली सोलापूर शहराची ३५ लाख लोकसंख्या गृहीत धरून १७० दशलक्ष लिटर क्षमतेची, १२० किलोमीटर अंतराची उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना नव्याने तयार करण्यात आली. यापूर्वी एनटीपीसी प्रकल्पाकडून मिळालेले २५० कोटी आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने दिलेले २०० कोटी अशा एकूण ४५० कोटी खर्चाची ११० दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी योजना मंजूर झाली. १८ महिन्यात काम पूर्ण करण्याचा ठेका हैदराबादच्या ‘पोचमपाड’ कंपनीला मिळाला. मोठ्या थाटात कामाचा श्रीगणेशाही झाला.

परंतु, थोड्याच दिवसांत कंपनीने किंमत वाढ मागितली आणि पुढे कंपनीचा ठेका रद्द होऊन करारही संपुष्टात आला. आता सुधारित १७० दशलक्ष लिटर क्षमतेची आणि ६३९ कोटी रुपयांच्या वाढीव किंमतीची योजना तयार झाली. योजनेसाठी अंदाजित ७०० कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. कोल्हापूरच्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनीला ठेका मिळाला. कंपनीने लगेचच कामही सुरू केले, परंतु लवादाकडे धाव घेतलेल्या पोचमपाड कंपनीने काम करण्याची इच्छा दर्शविली. आता तो तिढा सुटला नसल्याने काम जागेवरच थांबवावे लागले आहे. पैसे आहेत, मक्तेदारही नेमला, तरीपण काम सुरु झाले नसल्याने सोलापूरकरांना नियमित पाण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.

लवकरच होईल ठोस नियोजन

महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरकरांना दररोज पुरेल इतके पाणी देण्याचे ठोस नियोजन केले जात आहे. ‘स्काडा’अंतर्गत आता गावठाण भागात मीटरनुसार पाणीपुरवठा होईल. ५ मार्चनंतर त्यानुसार अंमलबजावणी होईल. काही दिवसांत समांतर जलवाहिनीचे काम सुरु करण्याचे नियोजन आहे.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, सोलापूर महापालिका

उन्हाळ्यातही चार दिवसाआडच पाणी

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी मागील तीन वर्षांत एकही टॅंकर लागलेला नाही. पण, सोलापूर ‘स्मार्ट’ होऊनही पाण्याचे टॅंकर बंद झालेले नाहीत. हद्दवाढ भाग शहरात येऊन ३० वर्षे उलटली, तरीदेखील तेथील नागरिकांना पाणी, रस्ता, ड्रेनेज या पायाभूत सुविधांसाठीच संघर्ष करावा लागत आहे. सध्या झोन क्रमांक दोन, तीन व चारमध्ये दररोज टॅंकर सुरु आहेत. सोलापूर शहराला दरवर्षी उन्हाचा तडाखा जाणवतो, तरीपण सर्वसामान्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. जोपर्यंत शहरांतर्गत पाणी पुरवठ्याची पाइपलाइन व वितरण व्यवस्था सुधारत नाही, तोवर नियमित पाणी मिळणे अशक्यच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील पाण्याची सद्यःस्थिती

  • अंदाजित लोकसंख्या

  • १२.३० लाख

  • प्रतिमाणसी दररोज अपेक्षित पाणी

  • १३५ लिटर

  • पाण्याची दररोजची गरज

  • १८९ एमएलडी

  • नागरिकांना मिळणारे पाणी

  • १२३ एमएलडी

आगामी सत्ताधारी सोडवतील का, पाणी प्रश्न?

सोलापूर शहरासाठी कधीही रात्री-अपरात्री तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जाते, तेही केवळ अडीच ते तीन तासच. धक्कादायक बाब म्हणजे ९० टक्के लोक इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी उपसतात आणि त्यामुळे शेवटच्या टोकाला असलेल्यांना पाणीच मिळत नाही. गावठाण भागाच्या तुलनेत हद्दवाढ भागात खूपच विदारक स्थिती आहे. निवडणूक आली की प्रत्येक राजकीय पक्षाकडून नियमित किंवा एक-दोन दिवसाआड पाणी देण्याची आश्वासने दिली जातात. मात्र, २७ वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाला पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. आता आगामी महापालिकेचे सत्ताधारी पाणी प्रश्न सोडवतील का, असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत.