Onion : निर्यातमूल्यामुळे कांद्यावर अघोषित निर्यातबंदी; बाजारभाव घसरला

कांदा निर्यातीवर ५५० डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य आणि ४० टक्के शुल्काचा बडगा उगारला. याचा परिणाम अखेर कांदा बाजारपेठेत दिसून आला आहे.
Onion
Onionsakal

सोमेश्वरनगर (जि. पुणे) - कांदा निर्यातीवर ५५० डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य आणि ४० टक्के शुल्काचा बडगा उगारला. याचा परिणाम अखेर कांदा बाजारपेठेत दिसून आला आहे. निर्यातीच्या आवईने प्रतिक्विंटल २२००-२३०० रुपयांवर गेलेला कांदा शनिवारी (ता. ११) पुन्हा १६०० ते १८०० रुपयांवर येऊन आपटला आहे.

गडगडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांची निर्यातीच्या नावाखाली पुन्हा एकदा फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत कांदा निर्यातदार, व्यापारी यांचीही कोंडी झाली आहे. पुन्हा एकदा सरकारने निर्यातमूल्य लावून अघोषित निर्यातबंदीच लादली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे बाजार समितीत उत्तम कांद्याला ५ मे रोजी २३०० रुपये दर होता तो १० मे रोजी १८०० रुपये प्रतिक्विंटल झाला. लोणंद (ता. खंडाळा) बाजार समितीत ६ मे रोजी २२०० रुपये प्रतिक्विंटल कांदा होता. नीरा (ता. पुरंदर) बाजार समितीत आज १६०० रुपये प्रतिक्विंटलवर घसरला.

बंदरावर कांद्याने भरलेले कंटेनर उभे

निर्यातबंदी ३ मे रोजी उठविल्यानंतर उत्तम कांद्याचा प्रतिक्विंटल १५०० ते १७०० रुपये असणारा बाजारभाव २३०० ते २४०० रुपयांवर जाऊन पोचला. शेतकऱ्यांना या निर्णयाबाबत संशय होताच आणि तो खरा ठरला. केंद्रसरकारने निर्यातीसाठी ५५० डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य आणि त्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावून निर्यातीस परवानगी दिली. परिणामी भारतीय किमतीपेक्षा पाकिस्तान, चीनचा कांदा स्वस्त दरात आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध होत आहे. परिणामी बंदरावर कांदा भरलेले कंटेनर उभे राहिले आणि बाजारपेठांतील बाजारभाव पडले.

निर्यातमूल्य व निर्यातशुल्क लावल्याने कांद्याची किंमत खूप वाढते आणि या भावात कोण बाहेर कांदे घेणार? निर्णयामुळे तीन दिवस तेजी राहिली आणि बाजारभाव पूर्ववत झाले. सध्या राजस्थानमध्ये आवक चांगली आहे. नाशिकचा कांदा सुरू आहे. त्यामुळे सध्यातरी तेजीची चिन्हे नाहीत.

- बिपिन शहा, कांदा निर्यातदार

चालू कांदा हंगामातील फसव्या निर्णयांची मालिका

  • २८ ऑक्टोबर - निर्यातमूल्य ४०० हून ८०० डॉलर प्रतिटन

  • ८ डिसेंबरला - ३१ मार्चपर्यंत पूर्ण निर्यातबंदीचा निर्णय

  • १७ फेब्रुवारी - ३ लाख टन कांदा निर्यातीची घोषणा

  • २० फेब्रुवारी - निर्यातीची घोषणा माघारी

  • २२ फेब्रुवारी - ५४ हजार ७६० टन एनसीईएलमार्फत निर्यातीची निरुपयोगी घोषणा

  • २७ एप्रिल - ९१ हजार १५० टन निर्यातीचा निर्णय (आधिच्याच निर्यातीची आकडेवारी)

  • ३ मे - निर्यातबंदी उठविली पण ५५० डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य व ४० टक्के निर्यातशुल्क लावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com