आता बोगस उद्योगांना असा बसणार चाप

उमेश बांबरे
Thursday, 16 July 2020

उद्यम पोर्टलवर नोंदणीसाठी जिल्हा उद्योग केंद्र व एमआयडीसीला स्वतंत्र पासवर्ड व लॉगइन आयडी मिळणार आहे. त्यानुसार त्यांना जिल्ह्यातील किती उद्योजकांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग श्रेणीत नोंदणी झाली हे समजणार आहे. केवळ उद्योजकांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
 

सातारा : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे वर्गीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाने उद्यम वेबसाइटवर उद्योगांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया एक जुलैपासून सुरू झाली असून, केवळ आधारकार्ड क्रमांकाच्या माध्यमातून या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. यातून बोगस उद्योगांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्वांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ही नोंदणी सुरू केली आहे. पोर्टलवर नोंदणी केलेल्या उद्योगांचे क्षमता व उलाढालीनुसार वर्गीकरण होणार आहे. त्यांना आगामी काळात विविध योजना व अनुदानाचा लाभ मिळणे सोपे होणार आहे.
तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा
 
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) नवीन सर्व उद्योगांचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांची उद्याम या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ही नोंदणीची प्रक्रिया एक जुलैपासून सुरू केली आहे. नोंदणीतून प्रत्येक जिल्ह्यातील उद्योगांचे वर्गीकरण केले जाणार आहे. यातून खरे उद्योग किती आणि बोगस उद्योग किती याची माहिती पुढे येणार आहे. काही जण बनावट उद्योग नोंदणी करून त्यातून अनुदान लाटणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे असे प्रकार करतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची उद्यम या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीनंतर उद्योगांचे वर्गीकरण होणार आहे.

राजस्थानच्या राजकीय घडामोडीविषयी महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणाले...

उद्योगांचे वर्गीकरण करताना उद्योगातील गुंतवणूक व मशिनरीची किंमत एक कोटीपेक्षा अधिक नसलेले आणि वार्षिक उलाढाल पाच कोटींपेक्षा अधिक नसलेले उद्योग सुक्ष्म उद्योगात समाविष्ट होतील. ज्या उद्योगातील गुंतवणूक व मशिनरीची किंमत दहा कोटींपेक्षा अधिक नाही. वार्षिक उलाढाल 15 कोटींपेक्षा जास्त नसलेल्या उद्योगांचा लघु उद्योगात समावेश होईल. मध्यम उद्योगासाठी 50 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक व मशिनरीची किंमत नसावी, तसेच त्यांची उलाढाल 250 कोटींपेक्षा अधिक नसावी. जी व्यक्ती सुक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योगात सहभागी होणार असेल त्यांना स्वयंघोषणापत्राद्वारे उद्यम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्‍यकता नसेल. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित उद्योजकास कायमस्वरूपी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यास उद्यम रजिस्ट्रेशन नंबर म्हटले जाते. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधित उद्योजकास नोंदणी सर्टिफिकेटही मिळणार आहे. या पोर्टलवरील नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केवळ आधारकार्ड क्रमांकावरूनही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या उद्योजकाची सर्व माहिती इतर विभागांकडून घेऊन त्या पोर्टलवरील नोंदणीस जोडली जाणार आहे. त्यामुळे इतर कोणतीही कागदपत्रे उद्यमच्या नोंदणीसाठी जोडावी लागणार नाहीत; पण एखाद्याने चुकीची माहिती भरून नोंदणी केल्यास संबंधितांवर अधिनियम 27 नुसार कारवाई होऊन दंड भरावा लागणार आहे. ही नोंदणी मार्च 2021 पर्यंतच ग्राह्य राहणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा उद्योजकांना निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचे लायसेन्स, पासपोर्ट क्रमांकाचा उपयोग करता येणार आहे. 

विरोध पक्ष नेते म्हणाले... ह्यांना हुकी आली आणि सातारा झाला लॉकडाउन 

नवीन विंचवाचा फलटणमध्ये शोध, निओस्कॉरपिओपस फलटणेन्सीस असे नामकरण

केवळ उद्योजकांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू

उद्यम पोर्टलवर नोंदणीसाठी जिल्हा उद्योग केंद्र व एमआयडीसीला स्वतंत्र पासवर्ड व लॉगइन आयडी मिळणार आहे. त्यानुसार त्यांना जिल्ह्यातील किती उद्योजकांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग श्रेणीत नोंदणी झाली हे समजणार आहे. केवळ उद्योजकांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Ministry Of MSMEs Appeals To Register Industries On The Enterprise Website