महाविकास आघाडीचे ऐक्य कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unity of Mahavikas Aghadi maintained

महाविकास आघाडीचे ऐक्य कायम

मुंबई - शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्यानंतरही महाविकास आघाडीत तीन मुख्य पक्षाचे ऐक्य कायम असल्याचा संदेश रविवारी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिला. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झालेला असला तरी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उपस्थित आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले.

दरम्यान, अध्यक्षपद निवडणूक आणि पक्षप्रतोदचा ‘व्हिप’ यावर महाविकास आघाडी एकत्रपणे सभागृहात आणि न्यायालयात संघर्ष करणार असल्याचे चित्रही आज सभागृहात दिसले. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी मांडला. तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिले. यावरून महाविकास आघाडी कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून केल्याचे मानले जाते.

कायदेशीर संघर्षाच्या पवित्र्यात

मतदानानंतर लगेचच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे ३९ बंडखोर आमदारांनी पक्षाचा ‘व्हिप’ पाळला नसल्याचा प्रस्ताव दिला. या सर्व बंडखोर आमदारांनी सभागृहात जाहीरपणे पक्षादेशाच्या विरोधात भूमिका घेतली असून त्याचे चित्रीकरण देखील झाल्याचे प्रस्तावात नमूद केले. अजय चौधरी यांनी प्रस्ताव दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उपाध्यक्षांनी प्रस्ताव वाचवा आणि तो पटलावर आणावा, अशी विनंती केली. त्यावर उपाध्यक्षांनी प्रस्तावाचे वाचन करून तो रीतसर पटलावर आणला. यामुळे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ही नोंद महत्त्वाची ठरेल, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे.

Web Title: Unity Of Mahavikas Aghadi Maintained

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top