स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची असुरक्षित दाटी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - रिक्षातून सुरू असलेली विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक.
स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची असुरक्षित दाटी! रिक्षात ८ तर ‘छोटा हत्ती’तून १६ ते १८ मुलांची वाहतूक

स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची असुरक्षित दाटी!

सोलापूर : शाळा सुरू झाल्याने स्कूल बसमधून मुलांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरू झाला आहे. एकाच परिसरातील तथा नगरातील मुले स्कूल बसमधून शाळेत ये-जा करतात. वाहनाचे भाडे परवडावे म्हणून वाहन चालक तथा स्कूल बसचालक क्षमतेपेक्षा अधिक मुलांची वाहतूक करत आहेत. पालकही कमी शुल्क द्यावे लागते म्हणून त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणारा हा गंभीर प्रकार थांबायला हवा आणि त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता

स्कूल बस असो वा अन्य कोणत्याही वाहनातून प्रवास करताना वाहन चालकाच्या बाजूला किमान एक व्यक्ती बसू शकते, असा नियम आहे. पण, स्कूल बसमध्ये त्या ठिकाणी तीन मुले बसलेली दिसतात. त्यांचे दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टॅंड असावे, असादेखील नियम आहे. पण मुलांना त्यांचे दप्तर घेऊन दाटीवाटीत बसून प्रवास करावा लागतोय. बहुतेक नियमांचे पालन न करताच स्कूल बसमधून चिमुकल्यांची वाहतूक सुरू आहे. अनेक वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहन चालवितात, असेही चित्र आहे. चिमुकल्यांच्या जिवाशी खेळून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त स्कूल बस तथा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अन्यथा भविष्यातील धोक्याला त्यांचीच यंत्रणा जबाबदार ठरेल, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

हेही वाचा: तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती

...तर शाळा व्यवस्थापन समिती जबाबदार
शहरातील विविध भागातील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी अनेक शाळांच्या स्कूल बस आहेत. काही शाळांनी शालेय समितीच्या परवानगीने खासगी वाहनेही त्यासाठी लावली आहेत. पण, स्कूल बसमध्ये प्रथमोपचाराचे साहित्य आहे का, मुलांना खाली उतरण्यासाठी स्टॅंड आहे का, आपत्कालीन परिस्थितीत वाहनातून बाहेर पडण्याची सोय आहे का, याकडे कोणाचेही लक्ष नाही अशी स्थिती आहे. पण, नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थी वाहतूक करताना काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित शाळेतील व्यवस्थापन समिती जबाबदार असणार आहे.

हेही वाचा: १८ जिल्ह्यात कमी पाऊस! राज्यात १ टक्काच पेरणी, ७५ मि.मी.ओलावा असल्यावरच करा पेरणी

विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक
कोरोनातून सावरताना स्कूल बसचालकांसमोरही अडचणी आहेत, पण चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ नको, अशी अनेकांची भूमिका आहे. स्कूल बसपेक्षाही ‘छोटा हत्ती’ आणि रिक्षातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना नियमांचे पालन केले जात नाही अशी वस्तुस्थिती आहे. बऱ्याच वाहनांना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचा परवानादेखील नाही. तरीदेखील ते विद्यार्थी वाहतूक करतात, त्याला ‘वरदहस्त’ कोणाचा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: विवाहानंतर पतीने दिली साथ अन्‌ विश्वास! पत्नी दुसऱ्याच प्रयत्नात झाली फौजदार

महापालिकेचे ‘परिवहन’ अडचणीत;
मुलींना मिळेना मोफत प्रवासाचा लाभ

शहरातील विविध भागातून शाळांमध्ये येणाऱ्या पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींना महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास दिला जात होता. दरवर्षी जवळपास सहा हजार मुलींना त्याचा लाभ व्हायचा. पण, सध्या महापालिकेची परिवहन सेवा अखेरचा श्वास घेत आहे. त्यामुळे त्या गरीब कुटुंबातील मुलींना पदरमोड करून खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. शासनाने मुलींचा उपस्थिती भत्तादेखील बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची अडचण वाढली आहे.

Web Title: Unsafe Crowd Of Students In School Bus 8 In A Rickshaw And 16 To 18 Children In A Four

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top