esakal | UP धर्मांतर प्रकरणाचं यवतमाळ कनेक्शन; कोण आहे धीरज जगताप?
sakal

बोलून बातमी शोधा

UP धर्मांतर प्रकरणाचं यवतमाळ कनेक्शन; कोण आहे धीरज जगताप?

UP धर्मांतर प्रकरणाचं यवतमाळ कनेक्शन; कोण आहे धीरज जगताप?

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : लखनौच्या एटीएस (विशेष तपास पथका) ने मुस्लिम धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली येथील एका तरुणास उत्तर प्रदेशातील कानपूर येथून शुक्रवारी (ता. एक) अटक केली. धीरज गोविंद जगताप देशमुख (वय 38 वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो यवतमाळच्या वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनीतील रहिवासी आहे.

मुस्लिम धर्मांतर प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेशातील लखनऊ एटीएस करीत आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी पुसद येथील वसंतनगर परिसरातील डॉ. फराज शहा यालाही अटक करण्यात आली होती. डॉ. शहा याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा यवतमाळच्या धीरज जगताप या युवकाशी संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे धर्मांतर करणार्‍या रॅकेटचा भंडाफोड झाला असून मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात देशभरातील विविध राज्यांमध्ये एटीएसने कारवाई केलेली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून एटीएसने धीरजला कानपूर येथून अटक केली आहे. त्याला अटक केल्याची माहिती मिळताच यवतमाळच्या स्थानिक एटीएस पथकाने आज धीरजच्या घराची झडती घेतली. परंतु, तेथे त्याचे वृद्ध आई-वडील राहत असल्याचे समोर आले. धीरजबाबत फारशी कुणालाही माहिती नाही. तो धर्मांतरप्रकरणात अर्थसाहाय्य करण्याचे काम करीत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी धीरज याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा संशय आहे. तेव्हापासून तो मुस्लिम धर्म परिवर्तनाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते. तो विवाहित असून त्याला एक छोटी मुलगी आहे. पत्नी मुलीसह माहेरी निघून गेल्याचे सांगण्यात आले. तो व्यवसायाने कंत्राटदार असून त्याचे पॉलिटेक्निकचे शिक्षण पुसद येथे झाले होते. त्यामुळे तो पुसद व काळी दौलतखान येथील मुस्लिम युवकाच्या संपर्कात आला होता. मुस्लिम धर्म परिवर्तनासाठी पुसद येथेच त्याचे ’ब्रेन वॉश’ करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, यवतमाळच्या एटीएस पथकाने धीरज याच्या यवतमाळ येथील घराची झडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. धीरजच्या प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात आलेले काही लोक अजूनही पुसदमध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच त्याचा यवतमाळ शहरातील काही राजकीय नेत्यांशी संपर्क असून त्या दृष्टीने स्थानिक एटीएस पथक तपास करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान एटीएस समोर आहे.

कुटुंबीयांना जबर धक्का

व्यवसायाने कंत्राटदार असलेला, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला, शांत स्वभाच्या धीरजला एटीएसने अटक केल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चार महिन्यांपूर्वी त्याच्याशी कुटुंबातील व्यक्तींचा संवाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन नातेवाइकांनी दिले आहे.

loading image
go to top