लस आलेली नाही; भान ठेवून वागा!  मुख्यमंत्री ठाकरेंच्या कानपिचक्‍या 

लस आलेली नाही; भान ठेवून वागा!  मुख्यमंत्री ठाकरेंच्या कानपिचक्‍या 


मुंबई ः "कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भान ठेवून वागावे,' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सण संयमाने साजरे केले तरी, आता नागरिक गर्दी करत असल्याने नाराज असल्याचे त्यांनी जनतेशी संवाद साधताना नमूद केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. काही जण मास्क न वापरता, कोणतीही काळजी न घेता फिरत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, "आता कोरोनाची लाट नाही, तर त्सुनामी येईल. आरोग्य सुविधा कमी पडतील. त्यामुळे विषाची परीक्षा का घेता आहात?' 

संयम बाळगण्याचे आवाहन हे कायदा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटते, असे नमूद करून ते म्हणाले, ""जगात कोरोना रुग्ण वाढत आहेत. अद्याप लस आलेली नाही. ती आली तरी प्रत्येकाला देईपर्यंत प्रचंड वेळ लागेल. त्यामुळे काळजी घ्या. काही नागरिक रात्री संचारबंदी लागू करा, अशा सूचना देत आहेत. अहमदाबादला रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपल्याला हे टाळायचे असेल तर काळजी घ्या. फटाके वाजवू नका, असे आवाहन केले होते. ते लोकांनी ऐकले. कायद्याचा बडगा न उगारता काही कामे करावीत अशा मताचा मी आहे.'' 
"शाळा सुरू करण्याचा विचार चालू आहे. पण, त्यातील धोका लक्षात घेतला तर कदाचित काही पावले उचलावी लागतील,' असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की काही जण सगळेच सुरू करा अशी मागणी करत आहेत; पण ते जबाबदारी थोडीच घेणार? माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे काळजी घेऊन योग्य वाटेल तेच सुरू केले जाईल. महाराष्ट्राचा आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे. राज्याचे आरोग्य आपल्याला कोरोना काळात कळले. त्यामुळे त्याबद्दल विचारपूर्वक पावले उचलली जातील, असेही त्यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री म्हणाले... 
मी सांगितल्याप्रमाणे पाडव्याला सर्व प्रार्थनास्थळे उघडली. 
कार्तिकी यात्रेला गर्दी करू नका. 
सर्वांनी सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला कोरोनाचा आकडा खाली आला. 
सगळ उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. 
दिल्लीत दुसरी-तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला. 
गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही. 
ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वृद्धांना त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी. 
लसीकरणाबाबत अजून सर्व अधांतरी आहे. 
जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा-ते उघडा सांगणाऱ्यांवर ती नाही. 
गर्दी टाळा, मास्क लावणे विसरू नका, हात धुत राहा आणि योग्य अंतर पाळा हेच कोरोना टाळण्याचे उपाय. 

लॉकडाऊनपेक्षा स्वयंशिस्त पाळा 
महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्‍याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळेही उघडली आहेत; पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्‍यात घालू नका. 
आपले सण-उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीलाही करावे, असे विनम्र आवाहन मी करीत आहे. 

आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी 
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवताना यंत्रणेतील सर्वांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनजागृती करणे साधेसुधे काम नाही. मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. त्यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्त्वाचे आहे. 

दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल 
मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले; पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्‍चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहेत. दिल्लीत दुसरी-तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय, असे वाटते आहे. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे; पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळे उघडे केले म्हणजे कोरोना गेला, असा अर्थ होत नाही. 
कोव्हिडनंतर रुग्ण खडखडीत बरेसुद्धा होत आहेत; पण पोस्ट कोव्हिड दुष्परिणाम सुद्धा दिसत आहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची? असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत. 

vaccine not come yet Chief Minister Thackerays warning to the citizens

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com