वंचित बहुजन आघाडी लढविणार विधानसभेच्या 288 जागा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

- आगामी विधानसभा निवडणुकीत दोन आकडी संख्येत बहुजन वंचित आघाडीला मिळतील जागा. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे विधानसभेसाठी आम्ही कोणाच्याही संपर्कात नसून, राज्यातील 288 विधानसभा लढवण्याचा तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याने भाजप सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आता ईव्हीएमच्या विरोधात दिल्लीत जनआंदोलन करावे लागणार आहे. त्यापूर्वी 25 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. त्यानंतर राज्यातील ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम छेडछाड करून मतांमध्ये कमी-जास्त फरक आढळून आला आहे. त्या हद्दीतील उच्च न्यायालयांमध्येही ईव्हीएमविरोधात याचिका दाखल करणात येणार असून, सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले.

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत दोन आकडी संख्येत बहुजन वंचित आघाडीला जागा मिळतील, असा विश्वासही ऍड.आंबेडकर यांनी व्यक्त केला.

जनआंदोलनात इतर पक्षांसाठी दरवाजे खुले

ईव्हीएमविरोधात बहुजन वंचित आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. या जनआंदोलनात सहभागी व्हायचे असल्यास सर्वपक्षांसाठी दरवाजे खुले आहेत. मात्र, हे जनआंदोलन कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली न उभारता, राष्ट्रीय ध्वजाखाली केल्या जाणार असल्याचेही यावेळी ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

जे येतील त्यांना सोबत घेऊ

आमच्यासोबत जे येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ असेही ते म्हणाले.

पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

अध्यक्ष : प्रकाश आंबेडकर
उपाध्यक्ष : शंकर लिंगे, ऍड.विजय मोरे, धनराज वंजारी
महासचिव : गोपीचंद पडाळकर, राजाराम पाटील, डॉ.सावंत, सचिन माळी, डॉ.ए आर अंजारिया, कुशल मेश्राम, किसन चव्हाण, अनिल जाधव, नवनाथ पडाळकर,शिवानंद हैबतपुरे
पार्लमेंट्री बोर्ड : लक्ष्मण माने, अशोक सोनोने, अन्नाराव पाटील
महिला आघाडी प्रमुख : रेखा ठाकूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi will Contest 288 Seats in Assembly Election says Prakash Ambedkar