esakal | सत्ता स्थापनेच्या हालचालींमधील आजच्या घडामोडी; वाचायलाच हव्यात
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ता स्थापनेच्या हालचालींमधील आजच्या घडामोडी; वाचायलाच हव्यात

- दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

- सरकार स्थापनेवरून नेतेमंडळींकडून काही वक्तव्यं करण्यात आली.

सत्ता स्थापनेच्या हालचालींमधील आजच्या घडामोडी; वाचायलाच हव्यात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : राज्यात सरकार स्थापनेवरून विविध पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर दिवसभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. काही पक्षांच्या नेतेमंडळींकडून त्याबाबत वक्तव्यं झाली, भेटीगाठीही झाल्या. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेतेमंडळींनी एकत्र येत किमान समान कार्यक्रमावर चर्चा केली. या बैठकीतच पुढील राजकीय बाबींवर चर्चा झाली. शिवसेनेला सलग 5 वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सहमती दिली जात नाही. शिवसेना हा हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. पण काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच यावर एकमत होत नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सर्व बाबींवर चर्चा पूर्ण झाल्या आहेत. आमचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकमत झाले आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच आता काँग्रेसची नेतेमंडळी उद्या शिवसेनेसोबत अंतिम चर्चा करण्यासाठी मुंबईला जाणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सह्या केलेले पत्रक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देणार आहे. जर सर्वकाही सुरळीत पार पडलं तर शपथविधी सोहळा रविवार किंवा सोमवारी पार पडेल. 

काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सकाळी भेट घेतली. काल काँग्रेसने सांगितले, की राज्यात स्थिर सरकार स्थापन व्हावे यासाठी चर्चा झाली आहे. त्यामुळे यावरून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता आहे. 

संजय राऊत म्हणाले, की मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, हा मोठा मुद्दा नाही. आम्हाला उद्धव ठाकरे हे पुढील 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे सिद्ध केले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 

loading image