बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ऊस लावायला शिकवणाऱ्या वसंतदादांनी सहकार क्रांती घडवली!Vasantdada Patil Death Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasantdada Patil Death Anniversary

Vasantdada Patil Death Anniversary : बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ऊस लावायला शिकवणाऱ्या वसंतदादांनी सहकार क्रांती घडवली!

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होय. वसंतदादांना सहकार क्रांतीचे जनक म्हटले तरी वावगं ठरणार नाही. त्यांचे सहकार क्षेत्रातील भरीव योगदान पाहूनच त्यांना गौरवण्यात आले होते. अशा या सहकार क्रांतीकारकाची आज पुण्यतिथी.

सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी त्यांचा जन्म झाला. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.

वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास आणि विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

शेताची पाहणी करणारे वसंतदादा

शेताची पाहणी करणारे वसंतदादा

कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले.

दादांनी 1956-57 मध्ये सांगलीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारला. ते कारखान्याच्या साईटवर रोज बारा-चौदा तास असत. ते तेथे हातावर चटणी-भाकरी घेऊन, वाळूच्या ढिगाऱ्यावर बसून खात असताना लोकांनी त्यांना पाहिले आहे. जनसामान्यांची निष्ठा मिळते आणि कार्यकर्त्याचे नेत्यात रूपांतर होते, त्यामागे असे कष्ट असतात.

डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटला दादांच्या निधनानंतर त्यांचेच नाव देण्यात आले आहे. त्या संस्थेत साखर उद्योगाशी संबंधित तंत्रवैज्ञानिक शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन चालते. संस्था पुण्याजवळील मांजरी येथे एकशेचाळीस एकर परिसरात आहे. देशातील आघाडीची संस्था म्हणून तिचा लौकिक आहे. त्यांनीच १९९४ मध्ये ‘को सी ६७१ वसंत’ ही वसंत दादांच्या नावे ऊसाचे एक वाण विकसीत केले आहे.

दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळेच 1967 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक लढे नोंदवले असतील,पण ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती ती नुसतीच ऐतिहासिक नव्हती तर ब्रिटिश हुकमतीला कृष्णेच्या पाण्याची ताकत दाखवणारी होती. सांगलीचे जेल फोडून, त्याच्या तटावरून पूर आलेल्या कृष्णेत ज्या बहाद्दर स्वातंत्र्य सैनिकांनी उड्या घेतल्या,त्यात वसंत दादा अग्रभागी होते. १ मार्च १९८९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.