ऑनलाइनच्या जमान्यात गरीब विद्यार्थ्यांसाठी वसंतपुरे गुरुजींची ऑफलाइन स्वाध्यायमाला 

संतोष सिरसट 
Friday, 28 August 2020

गुरुजींचे होतेय कौतुक 
वसंतपुरे गुरुजींनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, सोलापूर डायटच्या प्राचार्या ज्योती मेटे, गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे, विस्तार अधिकारी सुहास गुरव, केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे, सरपंच सरूबाई परचंडे, श्रीमंत येळमेली, राजशेखर सावळगी, गणपती चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले आहे. 

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्‍याच्या दुर्गम भागात आंदेवाडी बुद्रुक नावाचे गाव आहे. गाव तसे लहानच. त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळाही लहान. लहान शाळा असल्याने विद्यार्थ्यांचा पटही कमीच. अशा शाळेवर विजयकुमार वसंतपुरे नावाचे शिक्षक आहेत. सध्या कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे सगळीकडे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांच्याकडे ऍन्ड्रॉईड मोबाईलच नाहीत, त्या पालकांच्या पाल्यांनी या काळात करायचे तरी काय? असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावर उत्तर शोधण्यात वसंतपुरे गुरुजींना यश आले आहे. ऑनलाइन काळात गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरू केलेली स्वाध्यायमाला राज्यभरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. 

वसंतपुरे गुरुजी तसे टेक्‍नोसेव्ही आहेत. तंत्रज्ञानाची पुरेपूर माहती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती (कै.) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरवही झाला आहे. गावडी दारफळ, कौठाळी (ता. उत्तर सोलापूर) या गावच्या शाळेत त्यांनी केलेले काम आजही कौतुकास पात्र ठरत आहे. वसंतपुरे गुरुजींनी गरीब विद्यार्थ्यांची गरज ओळखून ही स्वाध्यायमाला सुरू केली आहे. विद्यार्थ्यांसोबतच त्या विद्यार्थ्यांच्या गुरुजींचाही प्रश्‍न या स्वाध्यायमालेमुळे मार्गी लागला आहे. सध्या या स्वाध्यायमालेच्या माध्यमातून जवळपास राज्यभरातील 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे वसंतपुरे गुरुजींसाठी कौतुकास्पद आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शाळा आजतागायत सुरू झाल्या नाहीत. शाळा बंद असल्या तरीही मुलांचे शिक्षण चालू रहावे, यासाठी विविध उपक्रमातून अनेक शिक्षक व संस्था कार्य करीत आहेत. वसंतपुरे गुरुजींनी सुरू केलेल्या "कोविड दैनिक स्वाध्यायमाले'चा शाळेतील 100 टक्के विद्यार्थी या उपक्रमातून दररोज शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या उपक्रमात वार्षिक नियोजनाचा अभ्यास करून दररोज एक छापील पान विद्यार्थ्यांना दिले जाते. अतिशय सुलभ असा बालभारती आणि गणित या दोन विषयांचा अभ्यास गुरुजींनी त्यामध्ये दिला आहे. पाठ्यपुस्तकाचे वाचन करून विद्यार्थी हा स्वाध्याय सहजपणे सोडवू शकतात. अभ्यासमाला तयार करताना पारंपारिक सराव पद्धत व आधुनिक ज्ञानरचनावाद यांचा सुरेख संगम साधण्यात गुरुजींना यश आले आहे. 

या उपक्रमासाठी सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, परभणी, धुळे, बुलढाणा, सिंधुदुर्ग, अमरावती, हिंगोली, गडचिरोली, नगर, रत्नागिरी, सातारा, पालघर व वर्धा येथील 200 पेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले आहेत. राज्यातील सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. काही शाळांनी प्रत्यक्ष प्रिंट देवून तर काही शाळांनी शाळेच्या व्हाट्‌सऍप ग्रुपवर स्क्रीनशॉट शेअर करून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळवून दिला आहे. वसंतपुरे गुरुजींनी तयार केलेल्या अभ्यासमालेमुळे अनेक गरीब पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

125 विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्यायमाला 
सर फाउंडेशन व शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत सुर्डीकर यांच्या सहयोगातून 125 विद्यार्थ्यांना ही स्वाध्यायमालिका छापील स्वरुपात मोफत देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे शाळा सुरु होईपर्यंत या विद्यार्थ्यांना स्वाध्यामाला मोफत देण्यात येणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasantpure Guruji's offline exercise for poor students in the online stage