solapur
rtorto

वाहनांचा फिटनेस आता ‘ब्रेक डायनामीटर’वर होणार! ‘या’ वाहनांसाठी ‘GPS’ सिस्टिमचे बंधन; ...त्या चालकांचे लायसन्स होणार निलंबित; ब्रेक डायनामीटर म्हणजे काय?

आरटीओ कार्यालयातील २५० मीटर ट्रॅकवर स्वत: आरटीओचे अधिकारी वाहनात बसून ब्रेक चाचणी घेतात. पण यापुढे मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांचा फिटनेस तपासला जाणार असून त्यासंबंधीची चाचणी ‘ब्रेक डायनामीटर’वर होणार आहे.

सोलापूर : आरटीओ कार्यालयातील २५० मीटर ट्रॅकवर स्वत: आरटीओचे अधिकारी वाहनात बसून ब्रेक चाचणी घेतात. त्यावेळी त्या वाहनाचे इंडिकेटर, हेडलाईड, चेसी, वायपर, रिफ्लेक्टर, ब्रेक, जीपीएस सिस्टिम व स्पिड गव्हर्नर अशा बाबींची तपासणी होते. पण यापुढे मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांचा फिटनेस तपासला जाणार असून त्यासंबंधीची चाचणी ‘ब्रेक डायनामीटर’वर होणार आहे. त्यासाठी सोलापूर आरटीओ कार्यालयात वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र (आयएनसी) उभारले जात आहे.

मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांचा फिटनेस तपासला जावा, वाहनाच्या प्रत्येक पार्टचे अचूक पद्धतीने निरीक्षण व परीक्षण व्हावे, यासाठी आरटीओ कार्यालयात निरीक्षण व परीक्षण केंद्र होत आहे. या केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार असून त्याची मोजणी शुक्रवारी (ता. २४) होणार आहे. तीन-चार वर्षांत रस्ते अपघात व अपघाती मृत्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामागे अनफिट वाहने हे एक प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक वाहनाला या ‘आयएनसी’ केंद्रातून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार आहे. चिरीमिरी घेऊन अनफिट वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्याचा प्रकार आता बंद होणार आहे. आता काही महिन्यांत सोलापूर आरटीओ कार्यालयातील ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक देखील इतिहासजमा होणार आहे. या बाबींमुळे रस्ते अपघात नियंत्रणात येतील, असा विश्वास राज्य परिवहन विभागाला आहे.

‘या’ वाहनांसाठी ‘जीपीएस’चे बंधन

प्रवासी वाहनांसाठी जीपीएस सिस्टिम बसविणे अनिवार्य आहे. दुसरीकडे राष्ट्रीय (नॅशनल) परवाना असलेल्या मालवाहतूक वाहनांसाठी देखील ‘जीपीएस’चे बंधन आहे. बंधनकारक असूनही ज्या वाहनांमध्ये ही जीपीएस नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. दोन हजारांचा दंड भरावा लागेल, असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाहन चालविण्याच्या लायसन्सविषयी...

  • तालुक्यातील कॅम्पमधील कोटा

  • शिकाऊ परवाने

  • १५३

  • पक्के लायसन्स

  • २३०

  • आरटीओ कार्यालयाचा कोटा

  • शिकाऊ लायसन्स

  • १५०

  • पक्के लायसन्स

  • १५०

...तर वाहन परवाना रद्द

चालकाला वाहन परवाना काढण्यासाठी जन्मदाखला (वयाचा पुरावा) व आधारकार्ड (रहिवासी पुरावा) लागतो. दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन दिल्यास संबंधित मुलाला वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन परवाना काढता येत नाही. त्या मुलाच्या पालकावरही दंडात्मक कारवाई होऊन त्यांना २५ हजारांचा दंड भरावा लागेल. दुसरीकडे विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्यपान करून वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा मालाची वाहतूक करणाऱ्या चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी किंवा कायमचा निलंबित होऊ शकतो.

ब्रेक डायनामीटर म्हणजे काय?

सध्या आरटीओ कार्यालयातील २५० मीटर ट्रॅकवर वाहनांची फिटनेस चाचणी होते. त्यावेळी आरटीओचा एक अधिकारी वाहनात बसलेला असतो. चाचणीनंतर त्या अधिकाऱ्याच्या अहवालानुसार वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र मिळते. मात्र, आता फिटनेस चाचणी ‘आयएनसी’ केंद्रात होणार असून तेथील ‘ब्रेक डायनामीटर’वर वाहन उभे केले जाईल. ताशी ४० किमी वेगाने त्या मशीनवर वाहन पळविले जाणार असून त्यावेळी वाहनाच्या प्रत्येक पार्टची चाचणी होईल. मशीनवर वाहन फिट किंवा अनफिट असल्याचा रिपोर्ट येईल आणि त्या वाहनाला तसे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

फिटनेस प्रमाणपत्र काढल्यावरच मिळतो विमा

फिटनेस प्रमाणपत्राशिवाय त्या वाहनाला विमा काढता येत नाही. विमा नसल्यास अपघातानंतर कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांनी आपल्या वाहनाची योग्यता चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. मुदत संपूनही फिटनेस चाचणी न केल्यास दररोज ५० रुपयांचा दंड भरावा लागेल.

- अमरसिंह गवारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com