
सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यांलगत वाहने थांबल्यावर लगेचच वाहतूक पोलिस ‘नो पार्किंग’चा दंड आकारतात. पण, ज्या ठिकाणी अन्यायग्रस्तांना न्याय मिळतो, त्या जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्यावर सध्या दोन्ही बाजूस बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यांच्याकडे वाहतूक पोलिस कानाडोळा करीत आहेत. वकिलांच्या नादी लागायला नको, अशी पोलिसांची सोयीची भूमिका त्या ठिकाणी दिसून येत आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून, ते काम पूर्ण व्हायला आणखी किमान दीड वर्ष तरी लागणार आहेत. त्यामुळे कोर्टात चारचाकी वाहनांचे पार्किंग बंद करण्यात आले आहे. त्याचा निर्णय झाल्यावर लगेचच अंमलबजावणी सुरू झाली, पण नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावू नका, असे आवाहन करूनही आणि विशेष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोरील मोकळ्या मैदानात वाहने लावण्याचा पर्याय देऊनही त्या ठिकाणी वाहने उभी न करता सोयीच्या ठिकाणी रस्त्यालगतच वाहने उभी केली जात आहेत.
कोर्टापासून हाकेच्या अंतरावर सर्वोपचार रुग्णालय असल्याने दररोज शेकडो रुग्णवाहिका रुग्णांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यासाठी ये-जा करत असतात. त्यांना देखील या वाहनांमुळे काहीवेळ सावकाश जावे लागत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, मागील आठवड्यातच त्या ठिकाणी वाहने थांबणार नाहीत, अशी अपेक्षा होती. पण, सद्य:स्थिती ‘जैसे-थे’ आहे, हे विशेष.
रंगभवन ते पोटफाडी चौक रस्त्यावर बेशिस्तीचे दर्शन
रंगभवन चौकातून काही अंतरावर एसटी महामंडळाचा थांबा असल्याने बसगाड्या रस्त्यावरच थांबतात. पुढे रस्त्यालगत हातगाडे उभे असतात आणि तेथूनच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता दुभाजक अधिकृतपणे तोडलेला आहे. तेथेच महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र आहे. त्याच्या बाजूला जुन्या कार विक्रीच्या निमित्ताने उभारलेल्या दिसतात. पुढे जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्याच्यासमोर शासकीय मेडिकल कॉलेज आहे. तरीदेखील, कोर्टासमोरच रस्ता दुभाजक तोडलेला आहे. त्यासाठी परवानगी घेतली की नाही, याची माहिती वाहतूक पोलिसांकडे देखील नाही.
अशातच कोर्टासमोरील रोडवर दोन्ही बाजूला बेशिस्तपणे कार, दुचाकी उभ्या असतात. सिव्हिल चौक ओलांडून पुढे गेल्यावर रुग्णालयासमोरील फुटपाथवर अतिक्रमण करून चहाची दुकाने थाटली असून, रस्त्यावरच रुग्णवाहिका थांबलेल्या दिसतात. रुग्णालयाच्या भिंतीलगत निराश्रित लोकांचे वास्तव्य पाहायला मिळते. असा सगळा प्रकार दररोज अधिकाऱ्यांना दिसतो, तरीदेखील सगळेजण केवळ बघ्याची भूमिका घेतात, याचे आश्चर्यच!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.