
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
पुणे : बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे ८३ व्या वर्षी शनिवारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. केंद्र सरकारने २००१ मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २००६ ते २०१० या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक काळ आघाडीवर ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. (Veteran Businessman Rahul Bajaj Passes Away)
हेही वाचा: राहुल बजाज यांचा अल्पपरिचय
बजाज यांच्यावर ह्रदयविकारामुळे एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांनी दुपारी अडीच वाजता अखेरचा श्वास घेतला. आज रात्री त्यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. बजाज उद्योग (Bajaj Auto) समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
राहुल बजाज यांना प्राप्त पुरस्कार आणि सन्मान :
२००१ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित
हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून माजी विद्यार्थी अचिव्हमेंट अवॉर्ड प्राप्त
फ्रान्स प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘नाइट इन द ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ म्हणून नियुक्त केले.
१९७५ ते १९७७ या कालावधीत ऑटोमोबाइल्स अँड अलाईड इंडस्ट्रीज विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती.
१९७५ मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता हमी संस्थेतर्फे 'मॅन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित
१९९० मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित सेवांसाठी बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन पुरस्कार
प्रिन्स ऑफ वेल्सकडून फेब्रुवारी १९९२ मध्ये "प्रिन्स ऑफ वेल्स इंटरनॅशनल बिझनेस लीडर्स फोरम" चे सदस्य
लोकमान्य टिळक मेमोरिअल ट्रस्टकडून २००० मध्ये टिळक पुरस्काराने सन्मानित
१९८६ ते १९८९ या काळात इंडियन एअरलाइन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
जिनेव्हा येथील इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिलच्या इकॉनॉमिक फोरमचे माजी अध्यक्ष
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य
ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशन, वॉशिंग्टन डीसीच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य
इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य
Web Title: Veteran Businessman Rahul Bajaj Passes Away
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..