गुरांचा डॉक्‍टर शस्त्रक्रिया करतोय- मोहन प्रकाश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई : नोटाबंदीच्या मुद्यावरुन कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाकयुद्ध रंगलेले असताना कॉंग्रेसने आता मोदींना "गुरांचा डॉक्‍टर' अशी नवी उपाधी बहाल केली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी, नोटाबंदीवरुन चाललेला गोंधळ म्हणजे गुरांचा डॉक्‍टर शस्त्रक्रिया करतोय, अशा शब्दांत थेट मोदींवर हल्ला चढविला.

नोटाबंदीच्या निर्णयामागे परदेशी कंपन्यांना फायदा करून देण्याचा नरेंद्र मोदींचा हेतू आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिल्याने परदेशी कंपन्यांना नेमका किती फायदा होणार आहे, याची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करण्याचे आवाहन मोहन प्रकाश यांनी मुंबईत केले. या तुघलकी निर्णयानंतर अवघ्या 45 दिवसांत सरकारने यासंदर्भात सुमारे 60 निर्णय घेतले असून यावरून सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटबंदीमुळे भारतीय चलन आणि "रिझर्व बॅंक' यांची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा घसरली असल्याचा दावा प्रकाश यांनी केला.

नोटबांदीच्या निर्णयाआधीच सत्ताधारी भाजपच्या जवळच्या लोकांनी आपले पैसे पांढरे करून घेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मताला जगभर किंमत आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे त्यांची खिल्ली उडवितात, हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेक स्थानिक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्लाही प्रकाश यांनी दिला. तसेच या गोंधळामुळे एटीएमच्या रांगेत ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी , अशी मागणी शेवटी त्यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veterinary doctor doing surgery, says mohan prakash on note ban