
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी (ता. चार) कोरोनामुक्त झाल्याची बातमी नांदेडला धडकल्यानंतर कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत अशोकराव बाजीगर ठरल्याचे सांगत ‘कोरोना हरला, अशोकराव जिंकले...’ असे म्हणत जल्लोष साजरा केला.
नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नेहमीच आयुष्यात संघर्ष करत यशाला गवसणी घातली आहे. मागील काही वर्षात त्यांना राजकीय तसेच सामाजिक जीवनात अनेक चढउतार पहावे लागले. कोणत्याही परिस्थितीत मन स्थिर आणि डोके शांत ठेऊन काम करणाऱ्या या मॅनेजमेंट गुरुने कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा हल्लाही परतून लावण्यात यश मिळवले आहे. गुरुवारी (ता. चार) कोरोनामुक्त झाल्याची बातमी नांदेडला धडकल्यानंतर कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत अशोकराव बाजीगर ठरल्याचे सांगत ‘कोरोना हरला, अशोकराव जिंकले...’ असे म्हणत जल्लोष साजरा केला.
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात गेल्या अडीच महिन्यापासून पालकमंत्री चव्हाण यांनी नांदेड तसेच मुंबई येथे काम केले. ते करत असताना त्यांना मुंबईत कोरोनाची लागण झाली होती. ते नांदेडला आल्यानंतर रविवारी (ता. २४) त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल संध्याकाळी आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईला येण्याचा आग्रह धरल्याने त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता ते कॉर्डियाक रुग्णवाहिकेने मुंबईला गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर ब्रिचकॅण्डी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाही त्यांचे मोबाईलद्वारे काम सुरुच होते.
हेही वाचा - पॉझिटिव्ह न्यूज - सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले...
नांदेडकरांचे प्रेम पाठीशी - आमदार अमर राजूरकर
विधानपरिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर म्हणाले की, पालकमंत्री श्री. चव्हाण गुरुवारी सकाळी बरे झाल्यानंतर ते मुंबईतील घरी आले असून आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. नांदेडकरांचे प्रेम, लाखो जनतेचे आशिर्वाद, डॉक्टरांचे प्रयत्न आणि परमेश्वरांची कृपा यामुळे श्री. चव्हाण बरे झाले आहेत. श्री. चव्हाण सुखरुप असून कार्यकर्त्यांनी आता काळजी करु नये. श्री. चव्हाण यांच्यावर वेळीच काळजी घेतल्यामुळे आणि चांगल्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे कोरोनाचे संकट टळले आहे. येत्या आठ पंधरा दिवसात ते नांदेडला येतील आणि पुन्हा जोमाने आपल्या कामाला लागतील. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा.
उदंड आयुष्य लाभो - डी. पी. सावंत
राज्याचे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळाल्यानंतर नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते, जनता यांना चिंता लागली होती. सातत्याने त्यांच्या प्रकृतीबाबत फोन येत होते. सर्वांनीच अशोकराव बरे व्हावेत, म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केली होती. परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली असून श्री. चव्हाण यांनी अखेर कोरोनावर मात केली असून गुरुवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ते घरी परतले असून लवकरच नांदेडला येतील. त्यांनी नांदेडला येऊन पुन्हा एकदा कार्यभार सांभाळावा तसेच त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आयुरारोग्य लाभो, त्यांच्या हातून नांदेड, मराठवाडा आणि महाराष्ट्राची सेवा घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात श्री. सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड महापालिकेला घ्यावा लागणार हात आखडता...
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद
पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याची बातमी कळाल्यानंतर नांदेडला कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब आदींनी पालकमंत्री चव्हाण यांच्याबाबतच्या भावना व्यक्त करत डॉक्टरांचे तसेच परमेश्वराचे आभार मानले तसेच श्री. चव्हाण यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, अशी प्रार्थना केली.