सुटकेचा प्रवास, दावे अन् प्रतिदावे!

एकाच जिल्ह्यातील दोन आमदारांत ‘व्हिडिओ - सेल्फी वॉर
Tanaji sawant, Kailas patil
Tanaji sawant, Kailas patilSakal

उस्मानाबाद - आमदार कैलास पाटील खोटे बोलून दिशाभूल करीत असल्याचा दावा माजीमंत्री आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दडपशाहीचा कोणताही प्रकार घडलेला नसून आमदार कैलास पाटील पूर्णपणे दिशाभूल करीत असल्याचे प्रा. सावंत यांनी व्हिडिओद्वारे म्हटले आहे. तर आमदार पाटील यांनी प्रवास केलेल्या ट्रकचालकासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे दिशाभूल कोण करतेय हे उघड होत असल्याचे पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शिवसेनेतील बंडखोरीच्या नाट्यात अनेक घडामोडी घडत आहेत. आमदार पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण सुरतकडे जाताना कशी सुटका करून घेतली, याबाबतची माहिती पुन्हा सांगितली. त्यावर प्रा. सावंत यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. आमदार पाटील यांनीच मला ठरलेल्या प्लॅनबाबत माहिती दिली. विधानपरिषदेची निवडणूक झाल्यावर तब्येत ठीक नसल्याने गावाकडे परतणार होतो. परंतु, त्याचवेळी आमदार पाटील यानी हॉटेल नंदनवनला जाण्याचे सूचित केले. आम्ही हॉटेल नंदनवनला भाईंची भेट घेतली. त्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे सर्वजण जात होतो. गुजरातच्या चेकपोस्टवर आल्यानंतर ‘गाडी थांबवा, मला लघुशंकेला जायचे आहे.

खाली या, चर्चा करायची आहे’ असे आमदार पाटील मला म्हणाले, त्यावर, ‘आता काय चर्चा करायची आहे? तूच मला सांगितलेस की आपल्याला जायचे आहे, असे मी त्याला विचारले. त्यावर ‘नाही साहेब, मला माघारी जायचे आहे. मला इकडे जायचे नाही’ असे पाटील म्हणाले. ‘आता असे कसे चालेल. आपले ठरले आहे, आपण बोलल्याप्रमाणे केले पाहिजे’ असे मी त्यांना सांगितले आणि नंतर ठीक आहे. तू जाणार असशील तर माझीच गाडी घेऊन जा, पाऊस येतोय. अजून दोन-चार गाड्या येणारच आहेत, असेही सांगितले.

त्यावर ‘नाही सर तुम्ही या गाडीतून पुढे जा’ असे सांगून पाटील परत गेले. मात्र त्यांनी अन्याय झाला, जबरदस्ती केली, असे मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. ते महाराष्ट्र, पक्षप्रमुखांची दिशाभूल करीत असल्याचेही प्रा. सावंत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.

ट्रकचालक भेटला देवदूताप्रमाणे ः पाटील

प्रा. सावंत यांच्या व्हिडिओनंतर आमदार पाटील यांनी त्यांच्या प्रवासातील ट्रकचालकासोबतचा ‘सेल्फी’ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. परतीच्या प्रवासात ज्या ट्रकने आलो, त्याच्या चालकासोबत दहिसरजवळ सेल्फी घेतला. हा चालक देवदूताप्रमाणे भेटल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रक क्रमांक, चालकाचा फोन क्रमांकही आपल्याकडे आहे. त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दिशाभूल कोणी केली, हे पूर्ण राज्याला कळले आहे, असेही पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com