Vidhan Sabha 2019 : एक सभा वॉटरप्रुफ मांडवातली; अन् एक भर पावसातली...!

सचिन बडे
Saturday, 19 October 2019

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात झालेली सभा.

पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात झालेली सभा.

पंतप्रधानांच्या सभेत पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करुन वॉटर प्रुफ स्टेज आणि मंडप उभारण्यात आला होता. त्यात सभेच्या जागेसाठी काही झाडांचाही कत्तल देखील करण्यात आली. सभेच्या वेळी पाऊस तर आला नाही, परंतु मोदी यांनी त्यांच्या कामांचा आणि आश्वासनांचा पाऊस मात्र सभेत पाडला. दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमदेवार आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या पचारार्थ सभा घेतली. शरद पवारांची ही सभा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहात कायमची नोंद होणारी ठरली. सभेला शरद पवार उभे राहताच पावसाला सुरुवात झाली. अनेकांना वाटलं पवार भाषण थांबवतील मात्र, पवारांनी भर पावसात भाषण सुरू ठेवलं. वयाच्या 80 व्या वर्षी पायांना जखमा असतानांही पवार भर पावसात सभेला संबोधित करत होते. तर हजारोच्या संख्येने नागरिकही या एतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले.

दरम्यान, मुंबईमध्ये पंतप्रधान देखील सभेला संबोधित करीत असल्याने टिव्ही मीडियाना त्यांना लाईव्ह दाखवत होती. त्यामुळे पवार यांची सभा अगदी शेवटी काही चॅनल्सनी लाईव्ह दाखवली. मात्र, पवार यांनी भर पावसात भाषण सुरू ठेवल्याने त्यांच्या सभेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्यास सुरुवार झाली. त्यांचे सभेचे फोटो व व्हिडिओ अनेकांनी शेअर करत त्याचे कौतुक केले. एका बाजूला पंतप्रधान मोदी यांच्या एका सभेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन पावसापासून त्यांचे सरंक्षण करण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला पवार हे उघड्या स्टेजवरुन भर पावसात जनतेला संबोधित करतात. या दोन्ही घटना अनेक गोष्टी न बोलता सांगू जाणाऱ्या आहेत. 

भारतीय जनता पक्षाने कोट्यावधी रुपये खर्च करुन राज्यातील मोदीच्या आतापर्यंत घेतलेल्या सभांवर पवार यांच्या पावसातील एका सभेने पाणी फेरल्याचे चित्र सोशल मीडियावर काही काही वेळेतच दिसत होते. 80 व्या वर्षीही अशी अफाट इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद यामुळे या विधानसभा निवडणुकीत पवार हे मोदींपेक्षा कितीतर पटीने सरस ठरल्याचे जाणवते. पवार यांची ही सभा साताऱ्यासह संबंध राज्याच्या निवडणुकीवर परिणाम करणारी ठरेल, असे चित्र सोशल मीडियावर अवघ्या काही तासातच तयार झाले.

पवार यांना देखील या सभेचे महत्त्व चांगलेच माहिती होते. त्यामुळे त्यांनी सभा सुरु आसताना आलेल्या पावसाला अडचण न समजता त्यांच्या चौकस बुद्धीने त्याकडे संधी म्हणून पाहिले. या सभेचा पुरेपुर फायदा त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 sachin bade writes blog about ncp leader sharad pawar satara speech