Vidhan Sabha Election : प्रत्येक पक्ष करणार स्वतंत्र सर्वेक्षण ;विधानसभेसाठी ‘मविआ’ची लवकरच बैठक

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागांचे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र सर्वेक्षण येत्या आठवड्यात करणार आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Election sakal

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागांचे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्र सर्वेक्षण येत्या आठवड्यात करणार आहे. जून महिनाअखेरीस जागावाटप चर्चेची पहिली फेरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्र लढावे, असे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी कळविले आहे. प्रत्येकी १०० जागांचे तीन गट करीत जागावाटप चर्चेला प्रारंभ करायचा अन् मग जिथे ज्याचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता सर्वाधिक त्या पक्षाला ती जागा द्यायची, असे प्रारंभिक सूत्र ठरले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यव्यापी अभ्यासाला प्रारंभ केला असून पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आज विदर्भातील जागांचा आढावा घेतला.

काँग्रेसचे अंतर्गत सर्वेक्षणही सुरु झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही पाहणी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षाचा तोंडावळा वेगळा आहे. राष्ट्रवादीला शेतीक्षेत्रात, शिवसेनेला (उद्धव ठाकरे) शहरी भागात तर काँग्रेसला विदर्भात अनुकूलता असेल. कोणताही वाद न करता हा पाया मानून चर्चा सुरु करण्यात येईल. ती २५ ,२६ जूनच्या सुमारास किंवा फारतर संसदेच्या अधिवेशनातील रजा किंवा अवकाशकाळात होईल. जूनअखेरीस चर्चेची पहिली फेरी पार पडलेली असेल आणि जुलैत काही जागा कोण लढेल हे घोषित केले जाईल, असेही एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) तीन तर उद्धव ठाकरे, संजय राऊत या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) दोन नेत्यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जागावाटपाच्या सुत्रावर चर्चा केल्याचे समजते.

मतांच्या टक्क्यांचा ऊहापोह

काँग्रेसला १७ जागा लढवून १६.९२ टक्के मते मिळाली तर शिवसेनेला (उद्धव ठाकरे) २१ जागा लढवून १६.५२ टक्के मते तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना १० जागा लढवून १०.२७ टक्के मते मिळाली, यावरही चिंतन केले. भाजपची मतसंख्या कमी झाली नाही शिवाय शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागा लढून १२.९५ टक्के मते घेतली, यावरही ऊहापोह झाला. मतांची टक्केवारी जागा वाटपातील अडसर न ठरण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले.

अभ्यासकांची मते विचारात घेणार

सिव्हिल सोसायटीने केलेल्या योगदानाची चर्चा करत अराजकीय व्यक्तींच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख या चर्चेदरम्यान झाल्याचे समजते. यातील काही अभ्यासकांची मते जागा वाटपाबाबतही विचारात घेतली जाणार असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com